Tuesday, April 26, 2011

पर्याय -नारायण कुळकर्णी कवठेकर


कवितेचा आणि दु:खाचा खूप जुना संबंध आहे. अकोल्याचे कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांची दु:ख, वेदना आणि काव्य सांगाती आहेत हे सुंदर रूपकात्मक भाषेत मांडणारी कविता...

पर्याय

शोध घेतला
तर- शब्दाच्या पाठीमागे
काळाठिक्कर चेहरा होता
भुकेल्या माणसाचा.
सहज पापुद्रा सोलल अक्षराचा
तर तिथे एकमेव दाणा जळका
कणसाचा.

वाकून पहावे पृष्ठांच्या डोहात
तर- जखम उघडी पडते
आतल्या आतली
अन ओळींनी पलटले
तर- दिसते काळी बाजू
आपली.
छापील अक्षरे सहसा
काळीच असतात
हे उगीच नव्हे.

वेदनेची ठणक कशी
लयबद्ध असते ठणठण,
डोळयातून अश्रू
ठिबकतात कसे टपटप
नादयुक्त,
काळजाचे ठोके चुकतात कसे
तर-छंदमुक्त.
शरीरातून घाम अन जखमेतून रक्त
वाहते कसे अनिर्बन्ध...

याचा अर्थ असा
की जोपर्यंत माणूस दु:खी आहे
-कवितेला पर्याय नाही.

-नारायण कुळकर्णी कवठेकर

फुलपांखरू - ग.ह.पाटील

शाळेत असताना ज्या गाण्यासोबत आपण मनसोक्त बागडलो आणि नाचलो तेच गाणं, कविता स्वरूपात...

फुलपांखरू

फुलपांखरू !
छान किती दिसते। फुलपांखरू

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसते। फुलपांखरू

पंख चिमुकले । निळेजांभळे
हालवुनी झुलते। फुलपांखरू

डोळे बारिक । करिती लुकलकु
गोल मणी जणुं ते। फुलपांखरू

मी धरू जाता । येई न हाता
दूर च ते उडते। फुलपांखरू

- ..पाटील

पिपांत मेले ओल्या उंदिर -बा.सी.मर्ढेकर

उंदरासारखं जगणं झालेल्या आपल्या शहरातल्या माणसांच जगणं, जे जगायला आणि मरायला देखिल लाचार आहे, ते मर्ढेकरांनी ५० वर्षांपूर्वीच टिपून ठेवलं... पण आजही ते तितकच योग्य आणि समर्पक आहे...

पिपांत मेले ओल्या उंदिर

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण;
गरिब बिचारे बिळातं जगले;
पिपांत मेले उचकी दउेन;
दिवस सांडला घार्‍या डोळी
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचचे पण;
मधाळ पोळे
ओठांवरती जमल तेही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

-बा.सी.मर्ढेकर

नको नको रे पावसा ...!! - इंदिरा संत

पावसाच्या येण्याने तारांबळ उडालेली एक स्त्री, नंतर पावसाला विनवते की तू इथे न कोसळता आठ कोस लांब वेशीजवळ जा आणि माझा सखा जो जायला निघाला आहे त्याला माघारी बोलव... पावसाला घातलेलं इतकं गोजिरवाणे साकडे विनापावसाचेही डोळे ओलावून जातं...अलगद...



नको नको रे पावसा ...!!

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंदमौळी
आणि दारात सायली;

नको नाचू तडातडा
असा कौलारावरन,
तांब सतेलीपातेली
आणू भांडी मी कोठून?

नको करू झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारातून,
माझे नसेूचे जुनेरे
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
तयाला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळयांत
तुझ्या विजेला पाजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंदमौळी
आणि दारात सायली....

- इंदिरा संत