Tuesday, August 20, 2013

काव्या

काव्या
चालता बोलता न येई तिजला, तरी अक्षरांना कवेत घेतले,
कवितेचे गूढं तिच्या माझ्या मनी शब्द दाटले...

काल अचानक आभाळ फाटले, पाऊस आला भेटावया,
पागोळ्यांतून कविता झरल्या अन् शब्द तिच्या ओंजळीत गोठले...

मी लिहीतो कविता तिजवरती अन् हसू फुलते ओठी,
रात्र मग थांबून राहते तिच्या संगे ऎकावया गोष्टी...

कविता, गाणी, गोष्टी आल्या संगे खेळावया
कुशित जाते मग त्यांच्या, स्वप्नांतील बागेत हिंडावया...
-ऋतु

विचार

विचार
विचार एकमेकांना भिडले कि मनात त्यांच द्वंद्व चालू होतं...
कित्येक वेळा मेंदूच्या सर्व नसांना विळखा घालून बसतात हे विचार..
नाहीतर डोळ्यातले स्वप्नांचे ढग पिळून त्यात भिजतात मस्तवाल साले..

समाजाच्या, नात्यांच्या चौकटीत तुम्ही आलात
की विचारांना खिरापतच मिळते जणू, धावतात हावरटा सारखे तूमच्या मेंदुत..
कोंबड्यांनी टोचून-टोचून अन्नं खावे तसे तुमचा मेंदू संपवतात टोचून-टोचून..

त्या वेळी तुमची कृती काय आहे हे मन ठरवते,
चुकलात तर तुम्हीच नालायक,
 बरोबर असाल तर सभ्य, सोशिक माणूस
असा काटेरी मुकूट चढवतो समाज
आणि परत ढकलतो विचारांच्या दुष्ट चक्रात....
-ऋतु

तरी

तरी

आलो आणि गेलो कुणी भाव दिला नाही,
मेलो घासूनिया तरी भाव आला नाही

चालताना पडे ही सावली दगडावर
तरी घासून दगड गुळगुळीत झाला नाही

कुरघोडी उजेडावर हा अंधार करतो
तरी गळा त्याचा दाबताच आला नाही

खुप होते लिहीलेले पत्रात त्या कोर्‍या
तरी शुभ्र अर्थ काढताच आला नाही

मलम होते घरामधे प्रथमेश तरी
नष्ट व्हावी वेदना विचारच आला नाही

-प्रथमेश किशोर पाठक