Tuesday, February 1, 2011

गंज

गंज

दिवसभराच्या कामातून
काळ्याठिक्कर पडलेल्या
काळजाला घेऊन,
पाण्याचा हात फिरवल्याने
उगीच शुचिर्भूत झाल्याच्या भासाने
झळाळणारे थोबाड घेऊन
तो घरी जायला निघाला की
रूळाकडे बघून कुत्सित हसायचा...
आज रूळाला म्हणाला...
मर साल्या असाच...
वर्षानूवर्ष सगळ्यांचं ओझं
खांद्यावर घेऊन फिरतो, म्हणून असा सपाट झालाय!
आज रूळानेही मौन सोडलं,
म्हणाला,
दोघात फारसा फरक नाही,
माझ्यावर चढलेला गंज दिसतो, फक्त इतकचं!

-प्रथमेश किशोर पाठक

काही चारोळ्या...

काही चारोळ्या...

एकच श्वास उसना दे
घेतलेल्या श्वांसाची
गोळाबेरीज करण्यासाठी,

एकच श्वास उसना दे
हरवलेल्या श्वासांना
शोधण्यासाठी...

**************************************

एकदाच क्षणभर पापण्या उचल,
एकदाच काळीज घायाळ कर,
तुझ्या गालची लाज उधळ
मला एकदाच नजरेत कैद कर

*************************************

मुका असला जरी कोणी
खुणा शब्दांच्याच करतो,
बहिर्‍यासही आवाजात
भास शब्दांचाच होतो

**************************************
-ऋतू

तुझ्याचसाठी...


तुझ्याचसाठी...

तू तहानली असताना
मी पाऊस होवून बरसावे,
अन पहाट तू होताना
मी धुके होवून पसरावे

उमलताना माझी फुले
ती पहाट तुझी मागती,
होवून वारा वाहतो मी
तुझ्याच रानाभोवती

तू किलबिलाट पक्षांचा
सांजेच्या घरट्यामधला,
मी सूर्य मावळतीचा
क्षितीजामधे लपलेला

तू ओळ कवितेमधली
मी शब्द तयाचा व्हावे,
तू ठेका शब्दांचा
त्याचा आशय मी व्हावे

वीजेसारखा स्पर्श तुझा
गात्रांचा थरकाप तुझ्यासाठी,
स्पंदनात अडकली तू
घे मिठीत जळण्यासाठी

मीपण माझे तूमय झाले
जगणे मरणे तुझ्याचसाठी,
तूच शरीर अन तूच आत्मा
मीही आता तुझ्याचसाठी

-प्रथमऋतू