कवितेचा आणि दु:खाचा खूप जुना संबंध आहे. अकोल्याचे कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांची दु:ख, वेदना आणि काव्य सांगाती आहेत हे सुंदर रूपकात्मक भाषेत मांडणारी कविता...
पर्याय
शोध घेतला
तर- शब्दाच्या पाठीमागे
काळाठिक्कर चेहरा होता
भुकेल्या माणसाचा.
सहज पापुद्रा सोलल अक्षराचा
तर तिथे एकमेव दाणा जळका
कणसाचा.
वाकून पहावे पृष्ठांच्या डोहात
तर- जखम उघडी पडते
आतल्या आतली
अन ओळींनी पलटले
तर- दिसते काळी बाजू
आपली.
छापील अक्षरे सहसा
काळीच असतात
हे उगीच नव्हे.
वेदनेची ठणक कशी
लयबद्ध असते ठणठण,
डोळयातून अश्रू
ठिबकतात कसे टपटप
नादयुक्त,
काळजाचे ठोके चुकतात कसे
तर-छंदमुक्त.
शरीरातून घाम अन जखमेतून रक्त
वाहते कसे अनिर्बन्ध...
याचा अर्थ असा
की जोपर्यंत माणूस दु:खी आहे
-कवितेला पर्याय नाही.
-नारायण कुळकर्णी कवठेकर