समर्थ रामदास स्वामींचा ’दासबोध’ हा एक निव्वळ ग्रंथ नसून त्यात वैश्विक तत्वज्ञान सामवलेलं आहे. आज ह्या ब्लॉग मार्फत आम्ही समर्थ दासबोधातील "मूर्खांची लक्षणे" हया समासातील काही श्लोक येथे सार्थ प्रस्तूत करायचे धाडस करीत आहोत! मूर्ख कोण असतो ह्याची अनेक लक्षणे समर्थांनी लिहून ठेवलियेत, त्याचप्रमाणे "पढतमूर्खांची लक्षणे", "गुरू कोण?", "शिष्य कोण?" असे कित्येक प्रश्न समर्थ आपल्या अलौकिक प्रतिभाशक्तीतून दर्शवतात... सरळ साधे काही जगण्याचे नियम हेच “दासबोध” आहे... जय जय रघुवीर समर्थ!!
१) परस्त्रीसीं प्रेमा धरी| श्वशुरगृही वास करी |
कुळेंविण कन्या वरी| तो येक मूर्ख ||
(जो परस्त्रीवर प्रेम करतो, सासर्याकडे जाऊन राहतो, कूळ न बघता लग्नाला होकार देतो...तो मूर्ख)
२) आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||
(जो स्व:ताचेच गुणगान करतो, स्व:ताच्या घरातही पाहूणा असल्यासारखा वागतो, वडिलांच्या किर्तीवर भास मारतो... तो मूर्ख)
३) अकारण हास्य करी| विवेक सांगतां न धरी |
जो बहुतांचा वैरी| तो येक मूर्ख ||
(विनाकारण हसत बसतो, हुशार लोकांशी संबंध ठेवत नाही, जो खूप लोकांशी शत्रुत्व बाळगतो...तो मूर्ख)
४) बहुत जागते जन| तयांमध्यें करी शयन |
परस्थळीं बहु भोजन- | करी, तो येक मूर्ख ||
(सगळे जागे असताना जो त्यांच्यामधे जाऊन झोपतो (night out करताना ध्यानात ठेवा), दुसर्या घरी नको इतकं जेवतो..तो मूर्ख)
५) औषध न घे असोन वेथा| पथ्य न करी सर्वथा |
न मिळे आलिया पदार्था| तो येक मूर्ख ||
(आजारी असून औषध न घेणारा, पथ्य न पाळणारा, काहिही अरबट चरबट खाणारा मूर्ख... नकळत समर्थ सांगतात junk food खाऊ नये)
६) आदरेंविण बोलणें| न पुसतां साअक्ष देणें |
निंद्य वस्तु आंगिकारणें| तो येक मूर्ख ||
(मान न ठेवता जो बोलतो, कोणी विचारलं नसतानाही आपलं मत व्यक्त करतो (facebook users साठी), अनैतिक गोष्टी अंगिकारतो...तो मूर्ख)
७) दोघे बोलत असती जेथें| तिसरा जाऊन बैसे तेथें |
डोई खाजवी दोहीं हातें| तो येक मूर्ख ||
(पहिली ओळ तर साधी सरळच आहे समजायला, सगळे असतना दोन्ही हातानी जो डोके खाजवतो...तो मूर्ख)
८) कळह पाहात उभा राहे| तोडविना कौतुक पाहे |
खरें अस्ता खोटें साहे| तो येक मूर्ख ||
(दोघे भांडत असताना त्याची मजा बघत जो तसाच उभा राहतो, खरं माहित असूनही खोटं सांगतो..तो मूर्ख)
९) लक्ष्मी आलियावरी| जो मागील वोळखी न धरी |
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी| तो येक मूर्ख ||
(श्रीमंत झाल्यावर जो आधिच्या ओळखी विसरून जातो, तो मूर्ख)
१०) आपलें काज होये तंवरी| बहुसाल नम्रता धरी |
पुढीलांचें कार्य न करी| तो येक मूर्ख ||
(आपलं काम होईपर्यंत जो अत्यंत विनम्र असतो आणि आपलं काम झालं की जो इतरांचं काम करायला मदत करत नाही..तो मूर्ख)