सृजनशील सौंदर्यविश्वाचा हंबर
निमित्त
किशोर पाठक ग्रेस,
दीप जळतो हे तर धादांत सत्य आहे, त्याला तेलाचा स्नेह लागतो हेही सत्यच आहे; आणि तळहातावर नेकीने वळलेली रुईची वात हा दिव्याचा ज्वलंतमंत्र आहे. पणतीच्या चिमुकल्या भातुकलीत एखादा किडा, एखादे रेशमी पैलूचे उड्डाण पाखरू त्या ज्योतीवर झेपावले की त्याची झेपावण्याची तर्हा ती जळती ज्योत इवलीशीही घायाळ न करत, त्याची मोक्षराख भिरकावून देते. आणि मग जळणार्या दीपिकेचे सर्व कवी, कलावंत युगानुयुगे, आळवून आळवून मंथन करीत असतात. पण दीपिकेने आपल्या नेत्रकटाक्षाने उडविलेली त्या यक:र्श्चित किड्याची चिमूटभर राख जर स्वत:च तडफडता स्वयंभू आकार धारण करून तिच्या प्रकाशाच्या दूरच्या कोपर्यात उभी राहून हे मोक्षराखेचे सूत्र गुणगुणू लागली तर. नव्या संहितेचा जन्म होतो.
ग्रेस,
ज्वालांचे धगधगते उज्ज्वल यश धारण केलेली स्वयंप्रज्ञा लौकिक बिंदूंना लाथेने उडवत, कुस्करल्या गेलेल्या कमलपत्रांच्या पाकळीभावनांना अक्षरांचे अवगुंठन देत नव्या सृजनशील शृंगाराचा मुहूर्तसाज उभारणारा एखादाच अक्षरभ्रष्ट योगी असतो. तो पुन:पुन्हा जन्मत नाही शरीराने. परंतु त्याचे मरणही नवनव्या शततारकांच्या उड्डाणसंज्ञांना पालाण घालते. नवनवे घायाळ संघर्षनाते उभारून ते जगणे मृत्यूच्या सं™ोनेच जिवंत ठेवत राहते. अज्ञानाच्या वैराणावर विराट वाळवंट उभारून स्वत: सोबत लक्षावधी शब्ददग्ध वियोगनिष्ठांना पायपीट करायला लावणारा तू एक विश्रब्ध अपरूप अवलिया, संध्यापर्वाची प्रार्थना उगाळून वैराण सूक्ताच्या अधांतरात स्वत:ला नि:संकोच तरंगत ठेवणारा.
ग्रेस,
समजून घ्यायचा नाहीच हा संकल्प ! की उमजून त्याचा लेखनाचा क्रियाकर्मविधी करायला मोकळे झालेले भाषापंडित कृष्णसर्प, त्यांच्या वळवळीतूनही तुझ्या विराट हिरवळीचा विषवल्ली न झालेला एकही कोपरा. धादांतामधून स्वत:ला लोकांनी उलगडत न्यावा म्हणून सोपा विनाकारण न होणारा एक संध्याकाळचा अक्षर संकल्प ! एका वैवस्वत कोड्यातून सुटून मन्वंतराच्या प्रदीर्घ प्रवासातूनही न उकललेल्या गूढाची संजदिक संवेदना! विविध विषय शास्त्रांचे, धर्मांचे, पंथांचे, संतांचे, फकिरांचे, फादरचे, भणंग अतिथींचे आकलन करून बसावे आणि ओळींच्या सारीपाटावर आपलीच सोंगटी भिरकावून द्यावी, म्हणावे ग्रेस हाच तर नाही जगण्याचा धागा? तर साजणसंगाची कुजबूज हजारो जंगलांमधून कृष्णपावलांची धडकून प्राणांचे असे लचके तोडत राहते की थेंबही सांडत नाही पण बंबाळातून देह सुटत नाही. राजपुत्र असो वा डार्लिंग, केशव, साऊल, वेणू, वंदना, वीणा, मिथिला, राघव, माधवी, प्राची.. आणि सीता, अहिल्या, भामापासून द्रौपदी.. हिटलरपर्यंत सारे प्रेमळ हिंस्त्र ऐवज एकाच स्वप्ननायकाच्या वास्तव राहुटीत जळत जाळत असलेले. हजारो वाचकांच्या बुलंद इमारतींखालून वाहणारे हे चंद्रमाधवीचे प्रदेश मितव्यासोबत सांजभयात हलत राहतात.
ये बिजली राख कर देगी
तेरे प्यार की दुनिया
न फिर तू जी सकेगा
और न तुझको मौत आयेगी
ग्रेस,
पावसाचे विलक्षण ठिबककारुण्य तुझ्या अक्षराअक्षरात गच्च भरलेले तुला पावसाचे पालाण आणि मागर्धाच्या आठवणींनी तुझा चंद्रजीव गोळा गोळा होत असताना पाऊस आभाळातून सुटलेला तरीही येणारा प्रत्येक थेंब वेगळा, खास माझा, माझाच कारण हा पाऊस ग्रेसचा आहे असं म्हणणारा ग्रेसफुल, रेनडिअरच्या कवितेतला काठोकाठ पाऊस एक डोह. भीतीच्या अर्थाची अनंत वलये साकारणारा गूढ वाच्यार्थ म्हणूनच ग्रेस म्हणतो-
घन जमतिल तेव्हा जमतिल
मोकळे केस तू सोड !
घन जमतिल तेव्हा जमतिल
वार्याचे अलगुज खोटे
हे दु:ख मिठीचे तोवर
हाडांना घेऊन पेटे..
या पेटत्या दु:खाची झळाळी घेऊन मृगजळाचं बांधकाम तोच करतो तो संध्यामग्न पुरुष असतो आणि करुणार्त मातेची ओली भावगर्भ बिंदी कपाळावर गोंदून जो काळोखाचा कण न कण पिंजून रात्र सैरभैर विखरून टाकतो. हे अद्भूत फकिरपण ना कुणास इतके गच्च ठासलेले, परिपक्वतेने अर्थांना संमोहित करणारे. ग्रेसची सगळी पात्रे त्यांचे अवयव अवतीभवती वावरणारे आपल्या ! आपल्यात असूनही दूरस्थाच्या परकाया प्रकाशात सचैल न्हात गाणारे !
ग्रेस,
लौकिकार्थाने मित्र-मैत्रिणी सुहृद कुणी असोत नसोत तरीही तुम्ही त्यांचे जे नसतीलही तुमचे किंवा असतीलही तुमचे जे नव्हतेच तुमचे तुमच्यापाशी. क्षितिजाच्या अधांतराशी सावळा रंगखेळ करणारी दिव्यशक्ती धारण करणारा तळहातावर असा कोणता ध्रुवतारा अढळमित्र होता तुमचा? जी. ए. की अजून कोणी? खरंतर तुमचा आणि जीएंचा प्रवास न भेटीचा म्हणून कडकडून जीवाचे त्या जीवात घालणारा. तुमचा किशोर पाठक निमित्त