Monday, April 23, 2012

पुळी...

किड्याच्या दंशाने हातावर पुळी आली
आजुबाजूला त्वचा लालभडक...
पुळी जळत होती आतून दिवसभर...
जरा दु:खाचा विसर पडावाम्हणून संध्याकाळी
खिडकीत येऊन उभा राहिलो...
खिडकीतून बाहेर बघताच जाणवलं,
पुळीच्या वेदनेनं त्रास होणारा मी एकटाच नाहीये...
सक्षितीजावर लालभडक रॅश आणि एक पुळी
जी आता अस्ताला जात होती...
दिवसभर जळजळ करून!
.
.
.
आता चंद्राचं सोफ़्रामायसीन लावावं लागणार!

- प्रथमेश किशोर पाठक

नि:शब्दता

किती बरं झालं असतं,
रस्त्याच्या बाजुला शहरं वसवता आली असती तर...
कमीत कमी अंधारात घर शोधायची तरी जबरदस्ती झाली नसती

किती बरं झालं असतं
जर नात्यांच्या भोवती चिटकवता आली असती माणसं Price Tag सारखी...
कमीत कमी बुधवारचा बाजार तरी रंगला असता

किती बरं झालं असतं
जर डोळ्यात रंगांचे पिंप भरता आले असते...
कमीत कमी अंधारात इंद्रधनुष्य तरी काढता आले असते

किती बरं झालं असतं
किती बरं झालं असतं
पण बरं होत नाही...जर- तर कमीच पडतात...
शहरात रस्ते फोफवतात,
अंधारात घरं फुटतात,
माणसं नाती बदलतात,
असलाच चांगला भाव तर विकून मोकळे होतात,
डोळे रंगांध होतात,
काळ्या कुट्ट अंधारात आरोळ्या मारतात...

किती बरं झालं असतं
जर कविता संपलीच नसती...
कमीत कमी नि:शब्दता मारत बसली नसती
पण बरं होत नाही...जर- तर कमीच पडतात!

-प्रथमेश किशोर पाठक

पराभव


(आपले आंतरीक पराभव आणि त्या पराभवातून आपण स्व:ताला काहिही आमिषं दाखवून सोडवू बघतो, लांब पळतो... परंतू आपण कितीही खोटी समजूत काढली तरिही वेदना होणारच!)

पराभवाचा काळोख झपाटून टाकतो मन
आणि मग समजुतींचा लगाम सावरू बघतो मनाच्या हिंदकाळलेल्या घोड्याला...
पंखात पूर्ण बळ येण्याआधिच छाटून काढावेत पंख,
तितकच क्रौर्य दडलेलं असतं ह्या खेळात!
आपण अस्ताव्यस्त होवून बघत असतो गुंता, मनातल्या भावनांचा...
कुरतडत नसलो तरी खूपत असते ती जखम...
आपण समजुतींच्या मलमाखाली लपवू बघतो तिचं नागडं अस्तित्व.
काही उसासे, एखाद-दुसरी मिठी आणि सहानुभूतीपर चार शब्द...
असाच प्रवास असतो त्या पराभवांचा क्षणिक दुर जाण्याचा...
याच आभासाच्या दोरांवर झोके बांधून
आपण घेत राहतो हिंदोळे कित्येक दिवस.
मनाचं मरण पुढे ढकलल्याचा आनंद....
पण सरणावरती चंदन ठेऊनही देह जळतोच ना!