Monday, September 3, 2012

फक्त


माझ्या कवितेतील हिवाळा असावा मर्ढेकरांसारखा,
हिरवळ पसरावी बालकवींसारखी,
समुद्र फेसाळावा बोरकरांसारखा,
माणूस जगावा कुसुमाग्रजांसारखा,
नाद असावा भटांसारखा,
ठसका असावा शांताबाईंसारखा,
माझी कविता पच्च्कन थुंकावी कोलटकरांसारखी,
वाद प्रतिवाद घडावेत विंदांसारखे,
नाजूक असावी इंदिराबाईंसारखी,
कवितेने मुस्काट फोडावे चित्रेंसारखे,
संध्याकाळ बघावी ग्रेससारखी
.
.
.
एक कविता माझी अशी असावी
पण,
ती फक्त माझी कविता असावी!

-प्रथमेश किशोर पाठक

शहारा


दूर आभाळावरूनी
काही ढग आले खाली,
पायरीच डोंगराची
त्यांनी टेकायला केली
अलगद टेकवूनी
अंग पाय पसरले,
अंग अंग डोंगराचे
कसे ढग ढग झाले

गारव्याने डोंगराचे
पान पान तरारले,
कवि म्हणे डोंगराच्या
अंगभर काटे आले
-प्रथमेश किशोर पाठक

बघ सये...


थेंब थेंब पावसाचा तुला चिंब भिजवत असेल,
बघ सये तोच पाऊस तुला काही सांगत असेल

पावसाच्या जाळीमधून गार वारा वाहत असेल,
काळ्या काळ्या मेघांमधे इंद्रधनू फसले असेल,
ऐक गाणे पावसाचे, ते तुला साद घालत असेल,
बघ सये...

हिरव्या हिरव्या रानाaaचे न्हाणे आता झाले असेल,
आसमंतही सूर्यफुलांनी सर्वत्र सजले असेल,
द्रुष्टी पडता सूर्यफुलाची, तेही गाली हसले असेल,
बघ सये...

क्षितीजावरती सूर्य आता अस्ताला जात असेल,
ऊब काढून स्रुष्टीमधली हवेत गारवा भरत असेल,
ओल्याचिंब भिजल्या तुला, मिठीत माझ्या यायचे असेल,
बघ सये...

रात्रीचा एकांत हा, तुझ्या सोबतीला असेल,
पाऊसही खिडक्यांमधून, घरामधे शिरत असेल,
दार उघड बघ पाऊस, अंगणात माझ्या तोच असेल,
बघ सये...

-प्रथमेश किशोर पाठक.