Monday, October 29, 2012

कोजागिरी

(कोजागिरीच्या सोनेरी चंद्राला बघून सुचलेली कविता...)

सार्‍या आकाशगंगेचा
भाव आज वधारतो
चंद्र कोजागिरीचा
सोने नभी उधळतो

सूर्यालाही वाटे रूप
त्याचे न्याहाळावे,
आश्विनातले हे सोने
पुनश्च लुटावे

नक्षत्रांचा न्युनगंड
आज वाढू लागे,
अन जाती लपूनी ते
मिल्की-वेच्या मागे

कोजागिरीच्या दूधाचे
कारण असे एक
रूप चंद्राचे दाखवाया
त्याला आरसा एक

-प्रथमेश किशोर पाठक

Friday, October 26, 2012

शिकस्त


विश्वात या जगण्याची ऐशी शिकस्त आहे,
मरणेच मुक्तीचा हा मार्ग प्रशस्त आहे

कळले न कधीही बेधुंद पापण्यांना
मिटुनी जा चिरंतन जगणे विवसत्र आहे

न भागे भूक का याच्या वितभर पोटाची
देश गिळाया बसला हे अजगर अज्यस्त्र आहे

चोरीत रे तयांनी  सामील देव केला
मागू न्याय कुठे मी जगणे विवस्त्र आहे

हातात रे भवानी रक्तात रे शिवाजी
पण शंढत्व घेऊनि मी अजुनी घरस्थ आहे

- भूषण

शेतकऱ्याची जीवनगाथा

झाड वसंताना फुलूनही त्याच्या जीवनाचा पान वाळकंच आहे
घनघोर कोसळणारा पाऊस  आणि घर त्याच गळकच आहे !! ध्रु !!

कष्टानं धान्य पिकून हि माणूस्किलाच बाजारात भाव नाही,
भुकेने आतुरल्या पोटाला अजून सुखाचा गाव नाही
अचाट महागल्या बाजारात त्याला मारण्यासही वाव नाही
ताज्या भाकरीची चव अजून जिभेला ठाव नाही
त्या ठिगळे लावलेल्या सदर्यावरच ते ठिगळ सुद्धा मळक आहे !! १ !!

मातीमध्ये जन्म आणि जीवनाची सुधा माती आहे
घरामध्ये अंधार आणि बिन तेलाच्या वाती आहेत
निगड भावपाश्यात गुंतलेली निगड प्रेमाची नाती आहेत
जगात रोख जगण्यासाठी जीवनाचीच उधारीची खाती आहेत
त्या ताव्याखाली भाकरीस आतुर एक लाकूड अजून जळक आहे !! २ !!

डोक्यावरती कर्ज आणि गळ्याभोवती फास आहे
पण हदयातून वाहणारा माणुसकीचा सुहास आहे
हुंडाबळी च्या रस्त्यावर लीकीचा प्रवास आहे
पावसासाठी आसुसलेले डोळे आणि सावकाराचा सहवास आहे
एकाच मायची लेकर सारी पण एक लेकरू अजून पोरक आहे !! ३ !!

- भूषण

Monday, October 1, 2012

पाडगावकरांचा जिप्सी


कसे व्यस्त दिनरात
साच्यामधे बांधलेले
फाटलेल्या भावनांना
नियमांनी सांधलेले

दिनभर ऑफिसात
फाईलींचा हा गराडा
दहा वीस मिनीटात
कविमनाचा चुराडा

तेवढ्यात आला  कोणी
दाराच्या आडून
आजवर होता माझ्या
मनात दडून

खुणावू लागला मज
दूर दूर जाया
क्षितीजाच्या अंगणात
भ्रमण कराया

घरटयात राहूनही
आकाशाची ओढ
मोकळ्या वार्‍याला जशी
स्वैरतेची खोड

विहरत होता
मुक्त सहजपणाने
आपल्या मस्तीत जसा
आपल्या मनाने

पाझरत होता त्याच्या
डॊळ्यात आनंद
भणंग अवस्था तरी
उत्सवात धुंद

चिंता नाही उद्याची
ना दु:ख प्राक्तनाचे
भय नाही पराजय
सुख ना जीताचे

ओळखले त्याला मीही
लगेच दूरून
नेहमीच वाचलेल्या
कविता स्मरून

जुना झाला तरी
आहे आजही तरूण
कविमनातला जिप्सी
खोल मनात दडून


-मयुरी बिरारी- खैरनार
 
 

संध्या


निजल्या संध्या तान्हुल्याच्या
ओठांवरला  गंध दुधाळी
जणू ढगाच्या शुभ्र लयींची 
शांत शांतशी  धुंद भूपाळी
एक आवर्तन !

...विरक्तीतला वड गंभीर
छाया कोंडून खोल आतवर
डोळे लावून बसला ठाणून
कोणास ठाऊक कशी अडकली
आशा वेडी !

...अंगावरचा थकवा टाकीत
चिंबन्हाल्या  गाई निघाल्या
परत फिरल्या आणि हरवल्या
क्षितीज पाहूंनी निळे पसरले
सुदीर्घ बाहू  !

 ...अशाच संध्या घेऊन येती
आठवणींची  अवजड पोती
कंठदाट नि अमुल्य मोती
जन्म सार्थकी  गाणी गाती
विस्मृतींची !

 -प्राज

जय हो!



पुन्हा एकदा नवी बातमी,
पुन्हा एकदा आम आदमी
पुन्हा एकदा पाळू मौन
आणि जाऊ भाव खाऊन...

पुन्हा मेणबत्त्यांची यात्रा,
पुन्हा 'जंतर-मंतर', जत्रा!
आणखी एका पुतळ्याचा भंग,
आणि आमचा जातीय रंग...!

पुन्हा एकदा छत्रपती हिरो
गांधी? ह्यांच्या दृष्टीने ते तर झीरो,
सावरकर तर दुर्लक्षित,
आमी नाय कोनाला भीत...!

फुले-टिळक-आंबेडकर,
छत्रपती अन आगरकर..
तुमचे ते आणि आमचे हे
जात-पात ? छे...! छे...!

राजकारणी भिक्कारचोट !
जनता म्हणजे नकली नोट...
तब्बल २६ पर-सेंट व्होटिंग,
"साला नेता करतो चीटिंग !"

आम्ही केले पेट्रोल स्वस्त,
पुर्वीचा 'इंडिया शायनिंग' मस्त,
धुवू कोळशाचे काळे 'हात',
रामराज्य? ते तर 'बौद्धिका'त..!

सुरक्षा व्यवस्थेची जावो रया,
राष्ट्रद्रोह्यांप्रत भूतदया,
सक्षम आहे पोलिस खाते,
''बडे शहरों में छोटी छोटी बाते!"

इकडे बघा, महागायक
१२वे वर्ष प्रसिद्धि-दायक,
इकडे आमचे महागुरू,
"चल बेट्या, हो जा शुरू!"

मायमराठी की तो मज्जाय 'भय्या'!
तिचे सैनिक मांडती ठिय्या,
भाषा-प्रांतवादाचा उच्छेद,
'कॉस्मो-पॉलिटन्' बुद्धिभेद !!

इकडे आमचे खळ-खट्टक्,
झालो फेमस, झाली अटक,
सायबांचा आमच्या जयजयकार,
स्कॉच-व्हिस्की गारेगार !

''अचूक बातमी ठाम मत''
च्यानलवर सायबांच्या पक्षाचे छत,
बाणेदार आणि आक्रमक..
बोलबच्चनांची नवी कुमक!

साहित्य संमेलनातील शोध,
वादे वादे तत्त्वबोध!
महान कवींची 'निवडणूक'(?)
आम्हां साहित्याची भूक !

मराठी सिनेमाची ऑस्करवारी,
प्रत्येक शिणेमात आयटम भारी,
(पण) सिरीयलसारखी मज्जा नाय..
रंगभूमी तर सेक्सी हाय...!

तरुण नाटकांचे नवेच प्रश्न,
दारू-पार्ट्या आणि जश्न,
साला 'अडोलेसन्स'मध्ये सेक्स नाय?
संस्कृती? भेन्चोद ! हाय हाय !

जय जय सद्गुरू ! जय हो बाबा !
इंद्रियदमन, श्वासावर ताबा,
हजारवर्षापूर्वीचं फाष्टेष्ट विमान,
भारतीय संस्कृतीची चढती कमान!

पवित्र वचने, दिव्य श्लोक,
सप्त पाताळे तिन्ही लोक,
प्रत्येक देवाला शंभर बळी,
दिव्य प्रचिती दूधखुळी..

नव्या युगाची नवीन वार्ता,
महासत्ता बनवू भारता,
परदेशांत बसून करू निश्चय
भारतमाते, जय हो... जय!!"
-हेमंत राजोपाध्ये