(प्रेमात भांडणं होणारच पण त्या भांडणात चूक कोणाची हे शोधू नये. त्या अबोल्यात आणि नंतर न समजवता पुन्हा एकत्र येणाच्या प्रक्रियेचा प्रवास ह्या गज़ल मधे...)
मी कधी म्हटलेच नाही की तुझीही चूक ही
कारवाई ही दुराव्याची तरी बेचूक ही
भास नाही हे मनाचे ना समजही बोबडी
जाणिवांची वाढणारी रे अबोली भूक ही
या चुकांचा पाहुणा मग टाळतो स्पर्शासही
त्यास कळते बोलणारी आज गात्रे मूक ही
शांत होई हे जसे की प्राण त्यागे देह हा
आणि आत्मा त्यागण्याची रे क्रिया नाजूक ही
टोचणारे शूल आता शून्य करते ही मिठी
चंद्रगंधी ह्या चुका अन काजळी लुक-लूक ही
-प्रथमेश किशोर पाठक