Wednesday, February 13, 2013

फुंकर

(वंचित झालेल्या प्रियकराने आता आपल्याप्रमाणे प्रेयसीही दु:खात आहे की नाही हे पहायला तिच्या घरी जाऊ नये... विदारक अनुभव येऊ शकतात...)

बसा म्हणालीस म्हणून मी बसलो
तू हसली म्हणून मी हसलो
बस्स इतकच...
बाकी मन नव्हतं था‍र्‍यावर
दारवरचा पडदा दपटीत तू निघून गेलिस माजघरात
माझ्यासोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या

ह्या जाळीच्या पडद्यात कशाला कोरलं आहेस हे हृदय
उलटं...उत्तान...
काचेच्या कपाटात कशाला ठेवल्या आहेस
भुश्यच्या राघू- मैना...
उडता आहेत लाकडी फळ्यावर कचक्ड्याची फुलपाखरं
आणि भिंतीवर रवि वर्म्याची पौष्टीक चित्रं
काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा
यातील एक टाका चुकली असतीस
तरी मी धन्य झालो असतो!

तू विचारलस, ’काय घेणार?’
काय पण साधा प्रश्न आहे... ’काय घेणार?’
देणार आहेस का ते सारं पूर्वीच
मला हवे आहेत चिंचेचे आकडे ते,
ते अधाशी ओठ, ती कुजबुज, त्या शपथा
दे झालं कसलही साखरपाणी!’
तुझं आणि तुझ्या पतीच हे छायाचित्र छान आहे
तुझ्यावरची सगळी साय ह्या फुगीर गालांवरून ओसंडून वाहतीये
बळकट बाहू, रूंद खांदे, डोळ्यात कर्तेपणाची चमक छान आहे
राग येतो तो तुझा
या चित्रात तू अशी दिसतेस अशी दिसतेच
जसं काय कधी झालच नाही...
मी तुला बोलणार होतो छद्मीपणाने,
निदान एक वाक्य,
एक जहरी बाण,
निदान एक... पण ते मला जमलं नाही
आणि तू तर नुसतीच हसत होतीस!

आता मला एकच सांग
उंबर्‍यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं,
इतकी का तुला सुपारी लागली?
पण
नकोच सांगू
तेवढीच माझ्या मनावरती एक फुंकर!
-
वसंत बापट  

जवळपणाचे झाले बंधन

(प्रेमातलं जवळपण पंखांच बंधन ठरू नये... व्यक्तित्वशून्य करणारं ठरू नये...)

इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन

छेडणार जर होतो आपण गीत नवे तर
हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर
धुंदपणी त्या अंधपणी त्या भान राहिले नाही हे पण...

मोह फुलांपरी तेव्हाचे ते क्षण दरवळले
गंधीत उन्मद त्या अंधारी काही न कळले
नव्हते जाणीव होईल म्हणून श्रृंखलाच हे मधू अलिंगन...

भरून राहिलीस तूच माझिया नेत्रामधूनी
निद्रेमधूनी, स्वप्नामधूनी, जागृतीतुनी
कळले आता असून डॊळे नव्हती दृष्टी नव्हते दर्शन...

गुंफियलेले कर हे झाले पहा साखळ्या
मीलन कसले जे न बघू दे दिशा मोकळया
खोल उरी कुणी तडफडले पण जाणवले नच ते आक्रंदन...

निकट असूनही श्वासापुरते दूर असावे
जवळपणातही पंखाना आकाश दिसावे
हवे वेगळेपण काहीतरी मीलनातही सखे आपुल्यातून...

जवळ जवळ ये पण सीमेचे भान असूदे
रात्र असो पण पहाटही वेगळी दिसू दे
स्वरजुळणीतून एक गीत तरिच हवेच अंतर सात सूरांतून...

-
मंगेश पाडगांवकर  

साठीचा गझल..

(आपल्या मित्राला साठीच्या वाढदिवसाला ऐकवलेली एक विनोदी कविता...)

सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी

आम्हीही त्यात होतो; खोटे कशास बोला?
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी

उगवायची उषा ती आमुची तिच्याच नेत्री
अन् मावळावयाची संध्या तिच्याच ओठी

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारूतीला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी

प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरूरी
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी

हसतोस काय बाबा तू बावीशीत बुढ्ढा
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी

- विंदा करंदीकर