Monday, June 3, 2013

मन


फुर्रकन उडून जावं कबुतर आणि
त्याचं एखादं पीस तरंगत रहावं हवेतल्या हवेत
वरपासून खाली येताना
हळू हळू हळू... अलगद अलगद...
तसच
मनही घुटमळंत रहातं अवतीभोवती - निघून जाताना...

चिकटलेल्या २ पेपेरप्लेट काढतानाचा
तो अस्वस्थ करणारा संघर्ष...
तसाच असतो
मनाशी होणार्‍या कासावीस संघर्षासारखा - समजूत काढताना...

आपल्या जन्मदात्या आईने देऊ नये
आपल्याला चार चौघात ओळख...
तसल्याच भयाण विचारासारखा असतो - मनाचा एकांत...

या मनाला जिंकावं म्हणून मी युद्ध करतो त्याच्याशी
त्याच्या मनमानीविरूद्ध बंड पुकारतोय
माझी सगळी इंद्रीये एकवटली आहेत
आणि
त्यांनी निर्णय घेतलाय मनाला हाणून पाडायचा...
पण
घडलं भलतच,
मी कविता करू लागलो...
आणि प्रत्येक कवितेच्या पूर्णविरामापाशी उलगडले
एक धडधडीत सत्य...

इंद्रीयांशी केलेला गनिमी कावा म्हणजे मन...’
-
प्रथमेश किशोर पाठक 

जगणे


जगणारे सारे । जगत राहीले ।
उच्छ्वास सोडले । श्वासांवर ।।

किती पेटवले । तरी ना पेटले ।
गुल मनातले । सादळले ।।

नियतीने सर्वा । जीवन वाटले।
काहींनीच केले । आनंदवन ।।

जगताना काही । रडवेले झाले ।
विसरूनी गेले । आनंदाश्रू ।।

जीवन काहींनी । पाखडले असे ।
सुख खडे जसे । टोचणारे ।।

कितीही शोधले । मिळाले ना दैव ।
शोधिती सदैव । आरशाविण ।।

-प्रथमेश किशोर पाठक

श्वास...


मृत्यू येइल तेव्हा बघू
आज थोडा जगून घे,
फेकून दे मृत्युचे भय
एकच श्वास उसना दे!

पैसा पैसा करतो काय?
सरणात लाकडाशिवाय काय?
आयुष्य संपत्ती खरी
चार नात्यात उधळून दे!

त्याच शोध घेतो कुठे?
मोक्ष देवळात मिळतो कुठे?
मैत्रीचा तो प्रसाद वाटे
अलिंगनांचे तिर्थ घे!

कविता म्हणे जमत नाही
शब्दात मुळी रसच नाही
मेघ काळा शब्दकोष तो
थेंबात अक्षरे वेचून घे!

कुठेतरी ती दूर असते
आठवण फक्त सोबत असते
संध्याकाळ आठव ती अन
कातरवेळ कुशीत घे!

झेंडू म्हणे सुंदर नसतो
गुलाबातही काटा असतो
उत्सव नसला दारी तरी
मनात तोरण बांधून घे!

-प्रथमेश किशोर पाठक.