Monday, November 11, 2013

छंद

जोपासला मी छंद ऐसा शून्य ज्याचे मोल रे
जे गुंतवी हास्यात पैसे, ते न जाती फोल रे

का चालती रस्त्यावरी ही माणसे रे लाघवी?
सांगीS स्टेथसस्कोप सारी ती शरीरे झोल रे

जो चौकटी बाहेरही शोधीत आहे कोपरा
तो जाणतो केव्हातरी; ही दुष्टचक्री गोल रे

काळे धुराडे पाहुनी आभाळ झाले बावरे
ते हुंगले तेव्हा कळे की, त्यात नाही ओल रे

रे सागरा ओढून घे, आता किनारे ते तुझे
होते ठसे जे तव किनारी तेच झाले खोल रे
-प्रथमेश किशोर पाठक

काठी


बाजूस नव्हता एकांतही भेट जाहली तेव्हा
परि सुटला नव्हता एकही ठोका ऐकयाचा तेव्हा

बुब्बुळांनीही दिधली होती तब्येतीची खुशाली
आनंदाचा पूर तो येता ती ही झाली खाली

अंबाड्याने त्यातही माझे लक्ष वेढले होते
झाली संध्या उशिरा कैसी उत्तर वदले होते

तळहातावर घेत श्वास मी तुझे; वळालो पाठी
उर्वरीत या आयुष्याची ही भेटच झाली काठी

-
प्रथमेश किशोर पाठक

क्रेन


खिडकीमधुनी बाहेर बघता
दिसते इमारतीवर क्रेन,
जणु शाईच्या बाटलीपाशी
कुणी खोचला फाऊंटन पेन

उंच उंच त्या इमारतींवर
क्रेनची लागे लांबच रांग,
जणू मल्ल ते उभे आखाडी
म्हणे लोळवू कुणास सांग

क्रेनवरी त्या इमारतीच्या
घिरट्या घालत बसते घार
ग्रासुन जाते आणि म्हणते
इतुका दूर का असे आधार?

इमारतीवर उभी राहूनी
क्रेन घडवीते इमारतीला
बहुव्रिही हा समास आहे
गर्भितार्थ मज आज कळाला

मी ही मग त्या इमारतीच्या
क्रेनपरी रे भक्कम होतो
संपवितो ही कविता आणि
मुंडके कामामधे खुपसतो
-प्रथमेश किशोर पाठक