Tuesday, March 18, 2014

मनाचा दगड

गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
आता माझ्या पास कळ्या
आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे आता ओझे
रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा

-आरती प्रभु

हासायाचे आहे मला

हासायाचे आहे मला
कसे? कसे हासायचे?

हासायाचे आहे मला
हासतच वेड्य़ा जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे कधी आणि कुठे
कसे आणि कुणी पास
येथे भोळ्या कळ्यांनाही
येतो आसवाचा वास

-आरती प्रभु

एका रिमझिम गावी

एका रिमझिम गावी
भरून आहे हृदयस्थ तान
पण
स्वगत विसरून
तिथे जाता यायला पाहिजे!

चालून जाता येण्यासारखी
पायतळी आहे माती
पण
जाणं न जाणं
तरी कुणाच्या हाती?

-आरती प्रभु