" अथांग सागराच्या वितभर पाण्यावर तरंगणारी
माझ्या अस्थिंची राख मला म्हणाली,
इथे जन्म घ्यायला हवा होतास -
अशी राखेतून व्हावी आयुष्याची सुरुवात !
आणि मग चितेच्या अग्निदिव्यातून पार पडून
सरणावर उठून बसावं आत्मविश्वासानं…
म्हातार पावलांनी चालत जाऊन
विश्रांती घ्यावी आधीच
की मग बळकट खांद्यांवर तोलायचंय
कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच भलमोठ्ठं आभाळ…
असं स्वकर्तृत्व सिध्द करून झाल्यावर
फक्त एकच रंग फुलावा - गुलाबी - तरुणाईचा…
स्वप्नांच्या हिंदोळ्यांवर स्वार होऊन
मुक्तपणे उपभोगावी ती नवलाई…
मग वेध लागावे आईच्या कुशीचे
दुडूदुडू धावण्याचे, अवखळ वागण्याचे…
खूप लाड करून घ्यावे, खूप खूप गोंजारून घ्यावं
साऱ्यांचं लाडकं होऊन अंगाखांद्यावर खेळावं
आणि अंत जवळ येताच
हक्कानं तिच्या गर्भात शिरावं…
शेवट असा निरागस व्हावा
त्या वितभर जागेत तरंगतानाच मोक्ष मिळावा…
अथांग सागराच्या वितभर पाण्यावर तरंगणारी
माझ्या अस्थिंची राख मला म्हणाली,
ओला झालास तर उडता येणार नाही…
कोरडं राहून बुडता येणार नाही…
चल, लवकर ठरव काय करायचंय ते…! "
- अमेय घरत