Thursday, January 1, 2015

लोकं जगतात - मरतात

लोकं जगतात - मरतात
ऐकुन जगाचं - मनातलच करतात
नाती जुळतात- तुटतात
थिगळ लावुन सॉरीचं
पुन्हा त्यांना जोडतात
दिवस येतात- जातात
रात्री फुलतात अन दिवसात विरतात
मी मात्र कण कण जळतो
मरुन सुद्धा उरण्यासाठी
मावळत्या सूर्यावर पुन्हा उगवण्यासाठी
बाकी क्षण येतात- जातात
एकदा मागे वळून बघतात
--- आज त्यांना सूर्यावरही डाग पडलेला दिसतोय!
-
ऋतू

प्रार्थना


लहानपणी खूप मोठी लिस्ट घेऊन
बसायचो मी देवबाप्पा समोर
मला हव्या असणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींची
तसा आता हि बसतो मी देवासमोर
आणि त्याला एखादा नमस्कार
मनापासून देऊन उठून जातो
माझी लिस्ट संपूर्ण झालीये म्हणून नाही
पण आता मी समजून गेलोय
मला हवं असलेलं काहीच त्याच्यापाशी नाही
आणि कधी विचारलं तर म्हणतो
तुला जे जे हवं आहे
तसे काही अस्तित्वातच नाही
-
अमेय

शोध


तुझ्या निराशेची गुपिते
तुझ्या वस्त्रांआड नाहीत

तुझ्या कोरीव नागव्या
देहावरही त्याच्या खुणा
सापडणार नाहीत

तुझ्यासमोर तात्पुरत्या
सुरकुतणा-या वस्त्रांच्या खोलवर घडीत
तुझी निराशा दडून बसली आहे.

-
अभिजित सोनावणे