नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे,
लिपीरेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे.
लिपीरेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे.
चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून,
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून.
शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन,
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण.
नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडीघडीतून,
नको पाठवू असे कितीकदा सांगितले मी, तू हट्टी पण !
पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते,
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते.......
-
इंदिरा संत