Thursday, January 21, 2016

देव...


वारा घोंघावत शिरतो शहरभर हत्तींच्या प्रचंड झुंडीसारखा
शहरातल्या मोठ्याच मोठया ईमारती
कापून काढतात वार्याची झुंड...मधोमध
ईमारतींच्या दारं-खिडक्यातून वारा गाळून निघतो...
आता पुढच्या ईमारतीसाठी उरलेली असते
वार्याची एक झुळूक आणि शेवटली ईमारत उकाड्याने हैराण!

आजची तरूण पिढी फारशी देव-देव करत नाही

आपण तयार केल्यात धर्मांच्या भिंती,
त्याला लावली दारं-खिडक्या जाती-पातीची

देव वार्यासारखा वाहत राह्तो...
देव पातळ होत जातो...

-प्रथमेश किशोर पाठक.


माझी कधीही न झालेली कविता -


कुंडलिनीसारखी सळसळत राहते ती माझ्या भावविश्वात,
जीवनातील प्रत्येक सत्यासमोर मला नागवं करून
दाखवून देते त्यांची व्यर्थता...
थकून झोपलेल्या गणिकेला जसा
माडीवरल्या चांदण्यात माधवाचा भास व्हावा,
तशी अवतरते ती माझ्या काळजाच्या धुपदाणीत...
पण तिला नको असते पूजा-अर्चा आरती
तिला, मला मुक्तता नकोच असते मुळी...
ती माझ्यात शिरून मोकळी होईपर्यंत
मी अलिप्त झालेला असतो तिच्यातून,
मी तिच्यात मुरून मोकळा होईपर्यंत
ती अलिप्त झालेली असते माझ्यातून...
मिलनाने एकमेकांच्या शोधाची तीव्रताच संपेल याची भीती वाटून
ती माझ्या मेंदूच्या कोणत्याश्या काळोख्या बधिर समाधी गुहेतून
धावत सुटते निळ्या जांभळ्या जटा विस्फारून
आणि मी क्षणभंगूर जगण्याचा तंतू घट्ट पकडून पृथ्वीवरच बसून राहतो
निष्कारण निष्फळ वांझोटी कूस कुरवाळत…

- अमेय घरत

प्रश्नोपनिषद


खचणार्‍या भिंतीसाठी
छत रडते का?
वाळलेल्या मातीसाठी
पाणी पडते का?

झाड जाळण्याला
सूर्य जळतो का?
गाव गाठण्याला
रस्ता पळतो का?

वाढलेल्या काजळीने
ज्योत विझते का?
गळा दाबल्याने
गाणे अडते का?

-दासू वैद्य


असेल जेव्हा फुलावयाचे


असेल जेव्हा फुलावयाचे
तुझ्याचसाठी फूल तु सखे
फूल सखे तू फुलण्यासाठी
फूल मनांतील विसरून हेतू

या हेतुला गंध उद्यांचा
या हेतुची कीड मुळाला
फूल सखे तू फुलण्यासाठी
या हेतूचा चुकवून डोळा

फूल सखे होवून फुलवेडी
त्या वेडातच विझव मला तू
विझव नभाच्या अळवाचरचे
स्थळकाळाचे हळवे जंतू!

-विंदा

प्रतिभेस


स्वैर करी संचार, प्रतिभे!
स्वैर करी संचार
तव नावावर, तव सेवेवर
हा माझा संसार ||

तव प्रेमास्तव वेडा झालो
सोडुनिया घरदार ||

तुझियास्तव ह्रुदयात दडपिले
दु:खाचे उद्गार  ||

तू उडता मी पतंगापरी
डुलत उडे हळूवार  ||

परि येथला बंध ओढितो
दु:सह मजला फार  ||

ही पहिली घे शीघ्र भरारी
जीवावरति उदार  ||

-बा.भ.बोरकर