Wednesday, March 21, 2012

आमची कविता...

आमच्या कवितेत नसतात,
कुणबी, गावरान शब्द, गाणारे पक्षी, सरकारवर ताशेरे, सावकारांचे अत्याचार,
पावसाला घातलेले साकडे, माळरान, जळालेलं पीक आणि विश्रब्ध करणार्‍या आत्महत्या...
आमची कविता असते ’अबोली’ सारखी
’त्यात मातीचा गंध नसतो’...असं समिक्षक म्हणतात...
आमच्या कवितेवर होतो आरोप
’ही कविता भाषा समृद्ध करित नाही!’
पण आमची कविता आणि आयुष्य
समृद्धीपेक्षाही वृद्धीकडे जास्त झुकते.
आमच्या कवितांचे संग्रह निघत नाहित कारण
साहेब सुट्टी मंजूर करित नाही.
आम्ही छंदोबद्ध कविता फक्त रविवारीच लिहीतो कारण
त्या दिवशी फुरसत असते अलंकार आणि छंदात मनसोक्त डुंबायची
एरवी आठवडाभर फक्त गर्दी
रस्त्यात माणसांची आणि कवितेत शब्दांची.
आमची कविता जन्माला येते ’वेंटिलेटर’ लावून
कारण एसी ऑफिस मधे खिडक्या बंद असतात.
आमची कविता फुलासारखी नाही,
ना आमच्या कवितेने व्रत घेतलय समाजसेवेचं!
’जून्या भळभळणार्‍या वेदनेला कमी करायचे असेल तर,
त्याच जखमेच्या बाजूला दूसरी मोठी जखम करावी’
अशा हिडीस वृत्तीतून जन्म घेते आमची कविता...
आमच्या कवितेला भूतकाळ नाही आणि
वर्तमानात वाचली किंवा ऐकली जाते इतकच तिचं अस्तित्व...
जे पुरेसं असतं एक तरी ठोका चुकवायला...
पण केवळ
आम्ही काळ्या कागदावर शुभ्र कविता लिहीतो म्हणून
आमच्या कवितेचं अस्तित्व अमान्य करू नका!
-प्रथमेश किशोर पाठक

वामांगी

(अरूण कोलटकरांची आम्हाला सर्वाधिक आवडणारी कविता... शेवटपर्यंत वाचा... शेवटच्या एका ओळीत मुस्कटात मारतात!)

देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट

मी म्हणालो -हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं
एकटेपण

- अरूण कोलटकर

रडायचे कुठे कळेना...

 रडायचे कुठे कळेना
कुठे हे अश्रू वाहायचे
आसवांना प्रश्न पडतो
कसे लपून राहायचे...

त्रासलेली माणसे ही
कुशी कुठे शोधायची
मिठीत या अनोळखी
किती मी गुदमरायचे...

मंदिराच्या गर्भाकोशी
येई मनात शांतता
गोठले हे अश्रू सारे
ईश्वरा त्या पाहता...

सांग ना रडू कुठे मी
सांग पाघळू कसा
दाटलेली आसवे ही
पाझरा गिळू कसा...

दिसे अशी अजाणता
प्रेतयात्रा अनोळखी
टाहो होते शब्द तीत
वेदनाही बोडकी...

त्या धुराच्या झोंबण्याने
डोळे असे सुखावले
गोठलेले अश्रू सारे
खळाळूनी की वाहले...

टाहो मी ही फोडिले अन
वेदनाही फाडल्या
आप्त नव्हते बघुनी मग
अश्रुधारा झाडल्या...

मोकळा तो निघून गेला
मोकळा मी जाहलो
मोकळा आसमंत तेव्हा
मोकळ्याने पहिला...

रडायचे कुठे कळेना
कुठे हे अश्रू वाहायचे
आसवांना प्रश्न पडतो
कसे लपून राहायचे...

- अमेय घरत

Tuesday, March 20, 2012

जगण्यामध्ये ब्रम्हानंद


बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.

सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रम्हानंद.

-विंदा करंदीकर

Monday, February 27, 2012

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज

आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या काही निवडक कविता...
’जागतिक मराठी दिनाच्या’ हार्दीक शुभेच्छा...

१) कौतुक म्हणजे
फुलमाळांची रास मनोहर,
त्याच फुलांची दुसर्‍या दिवशी
कचरा कुंडीत पडणारी भर

२) वडिलधार्‍या या पायांना
शतादिकांचे हात स्पर्शती,
खंत एक की, उरला नाही
हात एकही खांद्यावरती

३) आकशपण हटता हटत नाही
मातीपण मिटता मिटत नाही
आकाश - मातीच्या या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं
फिटता फिटत नाही

४) गेलिस ठेवून मस्तक जेव्हा
अगतिक माझ्या पायावरति,
ह्या पायांना अदम्य इच्छा
ओठ व्हायची झाली होती

५) भॆट जाहली पहिली तेव्हा
सांज पेटली होती,
रिमझिम वर्षेतूनि लालसा
लाल दाटली होती

काळ लोटला आज भेटता
नदी आटली होती,
ओठांवरती उपचारांची
सभा थाटली होती...

-कुसुमाग्रज

Sunday, February 19, 2012

भेंडी...


ती जगत गेली तेव्हातिने कुरतडून काढला आरशामागचा पारा...
आता ती हवं तसं जग बघते
फारशी गोंधळून न जाता!

तिने ठरवले होते
कागदी होड्या डबक्यात सोडणार नाही म्हणून...
होड्या राहिल्याही असत्या कदाचित पण,
उद्या एखाद्या उपाशी कुत्र्याने 
डबक्यातून तहान भागवली असती तर?

तिला वेडही नव्हते...सागरगोट्यांचे...
सागरगोट्यांची तिची असलेली एकमेव आठवण म्हणजे
भिंतीवर घासून चटका देण्याची!

तिने संभोगरेषांना कधी कागदावर उतरवले नाही
घर आवरताना कचरा म्हणून
फेकलं जाण्याची भीती असावी!

अचानक,
तिच्यातली एक पेशी बंड करून उठली,
आणि तिने बघता बघता व्यापलं
यकृत, काळीज, जठर आणि आतडी...
आता,
मेंदूच्या कुठल्याही धाग्यादोर्‍यांनी बांधता न आलेली ती पेशी,
’ती’ मन म्हणून मिरवते!
त्या मनाच्या गाभार्‍यातून आता
नित्य ऐकू येत असतात ती गात असलेली सुफ़ी गीते...
.
.
.
आणि माझ्यावर ’भेंडी’ चढत जाते!

-प्रथमेश किशोर पाठक

लपंडाव

रस्त्याने जाताना पायात तंगडं घालून पाडणे
हा तर आठवणींचा आवडता खेळ...
आठवणींना लपंडावही प्रीय आहे!
कट्टा, पार, कोपर्‍यावरचं साडीचं दुकान आणि माझी खोली...
भले ह्या जागा माझ्यासाठी लपण्याच्या बंदिस्त कोठड्या असतील
जिथे काळोखही दबकत दबकत शिरतो
पण
आठवणी तिथेही मला शोधून काढतात...मी मैदानात लपल्यासरखा!

मी सोनचाफ्यापाशी लपतो,
हा विचार करून की
एकदा ’त्याच्या’ सवलीत ’तिच्या’ केसात माळला होता ’तो’
आणि त्याच खुशीत 
तो शिशिरातही मोहोरलेला असतो आजकल...
त्याच हिरव्या झाडात, 
एखाद्या पिवळ्याजर्द चाफ्याच्या मागे लपेन
आनि आठवणींना ’धप्पा’ देईन...
पण त्या तिथेही मला हुडकून काढतात...’भॉक्क’ करतात...
माझा आणि आठवणींचा लपंडाव खूप दिवसांपासून चालूये...
आता मलाही मजा येऊ लागलिये ह्या खेळात!
फक्त 
भीती इतकीच वाटते,
आठवणींने मला पूर्ण शोधल्यावर जर
उद्या माझ्यावर राज्य आलं तर?

-प्रथमेश किशोर पाठक