Tuesday, March 18, 2014

मनाचा दगड

गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
आता माझ्या पास कळ्या
आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे आता ओझे
रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा

-आरती प्रभु

हासायाचे आहे मला

हासायाचे आहे मला
कसे? कसे हासायचे?

हासायाचे आहे मला
हासतच वेड्य़ा जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे कधी आणि कुठे
कसे आणि कुणी पास
येथे भोळ्या कळ्यांनाही
येतो आसवाचा वास

-आरती प्रभु

एका रिमझिम गावी

एका रिमझिम गावी
भरून आहे हृदयस्थ तान
पण
स्वगत विसरून
तिथे जाता यायला पाहिजे!

चालून जाता येण्यासारखी
पायतळी आहे माती
पण
जाणं न जाणं
तरी कुणाच्या हाती?

-आरती प्रभु

Monday, February 10, 2014

उगवत्या सूर्याचा शोध...


चोहीकडे पेटला वणवा
विझता विझेना
काय करावे आता माझ्या मना कळेना..

मी लाख केले प्रयत्न
जळायचे ते जळले
मन माझे निखार्‍यात पोळले..

आता विखुरली राख
शोधतो आहे
अस्थी मनाच्या मीच वेचतो आहे..

कसे घडले का कळेना
ठिणगीचा उगम
मिळता मिळेना..

आता शोधतो धुरात
क्षितीज नवे पण
उगवता सूर्य कुठेच दिसेना...


-ऋतू

कोळी...


भावनांच्या जाळ्यात अडकलेला मी
जसा कोळ्यानी अपल्याभोवती विणलेल्या जाळ्यात
अडकलेला किडा...

स्वत:भोवती नात्यागोत्यांचे सुंदर जाळे विणताना कोणाला
माहीत असतं की
ह्यातला कोळी आपण स्वत: नसून आपले इष्ट?
जे अजस्त्रपणे आपल्यावर मात करतात
आणि
आपल्या जाळ्यावर राज्य करतात...आपल्या नकळत

And one fine day आपल्यालाच गिळून टाकतात,
खाऊन टाकतात,
बंदी बनवतात...आपल्याच राज्यात

आता मी
अस्तित्वहीन,
भावनाशून्य,
परग्रही वावरणारा तुच्छ किडा...
.
.
.
स्वत:च्याच ग्रहावर स्वत:चं शारिरीक अस्तित्व संपेपर्यंत!


-ऋतू

Friday, January 10, 2014

मार्ग

चालतो मी सारखा हा चालण्याला अंत नाही
चाललो कोठे? कशाला?,ही ही आता खंत नाही

एकदा पूर्वी मलाही वेड होते शोधण्याचे
वेदनेवाचून काही लाभ झाला त्यात नाही

जाणत्या थोराकडेही खूप केली चौकशी मी
शब्द ज्याला तून कळले अज्ञतेला पार नाही

योजनेचा या नकाशा ज्या ठिकाणी ठेवलेला
खंदकाने वेढलेल्या त्या स्थळाला दार नाही

ना कळावे हीच इच्छा जो कुणी आहे तयाची
शोधता त्याच्या कृपेचा शोधका आधार नाही

मी म्हणोनी सोडला तो नाद आता मंझिलाचा
चालण्याचे श्रेय आहे अन्य धर्माचार नाही

-
कुसुमाग्रज

स्मृतिगीत

(या कवितेला उत्तर-रामचरित्राची पार्श्वभुमी आहे)

आठवतो का सांग सखे तो काळ विवाहाचा
बाळपणाचा मुक्तपणाचा निर्मळ भावाचा

संसाराचे चित्र चिमुकले चिमुकलेच जीव
फुलले नव्हते हृदयांचे ते राजस राजीव

पहात होते तात तदा त्या लीला बाळांच्या
जणू आठवती त्यासही लीळा त्याच सुकाळाच्या

जपती पदोपदी प्रसन्न हृदया पुण्यमया माता
गेले ते दिन सीते यापरि हा बघता बघता

बालपणाचे प्रसंग जणु ते फिरती घडती आज फिरुनी
चित्रपटा या अश्रुजलाने चल टाकू धुवुनी

ती सीता तू तोच राम मी त्याच आज माता
परि जे गेले ते दिन आता येतिल का हाता

कशास आशा आता नसती झाले ते गेले
सुकले फुल न वास देत जरी अश्रुंनी भिजले

-
गोविंदाग्रज