Friday, August 1, 2014

या नभाने या भुईला दान दावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे

- ना. धो. महानोर

ज्यांची हृदये झाडांची

ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात
तेच वाढतात प्रकाश पितात तेच ऋतू झेलून घेतात

त्यांना मुळीच गरज नसते व्याख्यानबाज कंठांची
कानठळ्या बसवणार्‍या अध्यात्मिक घंटांची

त्यांना माणूस शिडी नसतो पाय ठेवून चढण्याची
त्यांच्या कुशित जागा असते हरलेल्याला दडण्याची

सत्तेवरती थुंकण्याचीही त्यांना मुळीच सवड नसते
निषकपट ऊन त्यांच्या खांद्यावर खेळत बसते

ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात
तेच फक्त गुच्छासारखा पावसाळा हुंगून घेतात

-
मंगेश पाडगावकर

जसे पावसाळे नभाशी बिभाशी

जसे पावसाळे नभाशी बिभाशी
तशी तूही माझ्या मनाशी बिनाशी


मनी पावसाळी 'मळब' साचले ग
तुझी याद आली मघाशी बिघाशी

किती साचला 'गोडवा' चेह-याशी
तुझी काय स्पर्धा मधाशी बिधाशी

कसा घास गिळती, तुझ्या चेह-याचा
लोचने जाहली का अधाशी बिधाशी

 तुला पाहता होत असे 'पेटपूजा'
कसा मजनू मरतो उपाशी बिपाशी 

जरी व्यक्त होते गझल बोलणारी
मौन साचलेले, तळाशी बिळाशी 

दिले ह्रदय तुही, दिले ह्रदय मीही
अता काय 'घेणे' जगाशी बिगाशी

-गुरु
(गुरुप्रसाद जाधव)

Wednesday, June 4, 2014

कधी कधी

कधी कधी भेटयोग असाच जुळून येतो,
कधी कधी अचानक मोगरा फुलून येतो

विचारही नसतो आग्रहही नाही,
पेपरमधे तसे भविष्यही नाही,
कधी कधी मंगळही गालात हसून घेतो...

छोटी भेट, छोटे संवाद, छोटेसे हसू,
सांगणे अपुले इतुकेच ’एकमेकांसाठी असू’
कधी कधी कुणाचे असणे कणा ताठ करून जातो...

घट्ट मिठी मारली का? नक्की माहित नसते,
आजवर कधी साधी मिठी मारलेलीच नसते,
कधी कधी ठोकाही क्षणात खंडकाव्य लिहून जातो...

जसे भेटणे तसेच निघणे अचानकच असते,
वळून पहायचे किती? काही बंधनही नसते,
कधी कधी ’कधी कधी’ चे आभार मानत बसतो...

-प्रथमेश किशोर पाठक

मित्र ?


ज्या कळ्या आहेत सडल्या त्या कधी खुलणार का
मी पणा जागृत ज्यांचा मित्र ते होणार का

दाखवावा चंद्र त्यांना ते नखुर्डे पाहती
भग्न त्यांच्या अंतराळी कृत्तिका दिसणार का

जाणताती हेच ते ज्वालाग्रही व्हावे कसे
जाळती सहवास ज्यांचे ऊब ते देणार का

ना मिळे त्याच्या मनातील अक्षरांना श्वासही
जे स्वत: स्फुरलेच नाही कधी लिहीणार का

गीत त्यांचे ऐकता थरकाप होई घाबरा
आत्मकेंद्री सूर यांचे ते मना भिडणार का

-प्रथमेश किशोर पाठक

हतबल

इच्छामरणी भीष्म जसा की
हतबल सारे झाले,
मरायचिही इच्छा आहे
पार्थ कुणा ना मिळे

झोपायाची हौस तरिही
झोप नसे काहिंची,
स्वप्न पाहुनी जागे होती
हतबल स्वप्ने यांची

काळजातला शब्द कधी
ना तोडून गेला तुरूंग
नात्यांखाली पेरीत गेले
हतबलतेचा सुरुंग

गाणे होते कसे विषारी
कळते ’ते’ गातांना
श्रुती यांच्या हतबल सार्‍या
स्वरांमधे दडलेल्या

जगण्यावरचे इंद्रधनू
हे पडे जरा तोकडे,
हतबल आहे तरिही जगती
हेही नसे थोडके!

-प्रथमेश किशोर पाठक

Wednesday, April 30, 2014

मोक्ष


" अथांग सागराच्या वितभर पाण्यावर तरंगणारी

माझ्या अस्थिंची राख मला म्हणाली,

इथे जन्म घ्यायला हवा होतास -

अशी राखेतून व्हावी आयुष्याची सुरुवात !

आणि मग चितेच्या अग्निदिव्यातून पार पडून

सरणावर उठून बसावं आत्मविश्वासानं…

म्हातार पावलांनी चालत जाऊन

विश्रांती घ्यावी आधीच

की मग बळकट खांद्यांवर तोलायचंय

कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच भलमोठ्ठं आभाळ…

असं स्वकर्तृत्व सिध्द करून झाल्यावर

फक्त एकच रंग फुलावा - गुलाबी - तरुणाईचा…

स्वप्नांच्या हिंदोळ्यांवर स्वार होऊन

मुक्तपणे उपभोगावी ती नवलाई…

मग वेध लागावे आईच्या कुशीचे

दुडूदुडू धावण्याचे, अवखळ वागण्याचे…

खूप लाड करून घ्यावे, खूप खूप गोंजारून घ्यावं

साऱ्यांचं लाडकं होऊन अंगाखांद्यावर खेळावं

आणि अंत जवळ येताच

हक्कानं तिच्या गर्भात शिरावं…

शेवट असा निरागस व्हावा

त्या वितभर जागेत तरंगतानाच मोक्ष मिळावा…

अथांग सागराच्या वितभर पाण्यावर तरंगणारी

माझ्या अस्थिंची राख मला म्हणाली,

ओला झालास तर उडता येणार नाही…

कोरडं राहून बुडता येणार नाही…

चल, लवकर ठरव काय करायचंय ते…! "

- अमेय घरत