Tuesday, February 1, 2011

गंज

गंज

दिवसभराच्या कामातून
काळ्याठिक्कर पडलेल्या
काळजाला घेऊन,
पाण्याचा हात फिरवल्याने
उगीच शुचिर्भूत झाल्याच्या भासाने
झळाळणारे थोबाड घेऊन
तो घरी जायला निघाला की
रूळाकडे बघून कुत्सित हसायचा...
आज रूळाला म्हणाला...
मर साल्या असाच...
वर्षानूवर्ष सगळ्यांचं ओझं
खांद्यावर घेऊन फिरतो, म्हणून असा सपाट झालाय!
आज रूळानेही मौन सोडलं,
म्हणाला,
दोघात फारसा फरक नाही,
माझ्यावर चढलेला गंज दिसतो, फक्त इतकचं!

-प्रथमेश किशोर पाठक

काही चारोळ्या...

काही चारोळ्या...

एकच श्वास उसना दे
घेतलेल्या श्वांसाची
गोळाबेरीज करण्यासाठी,

एकच श्वास उसना दे
हरवलेल्या श्वासांना
शोधण्यासाठी...

**************************************

एकदाच क्षणभर पापण्या उचल,
एकदाच काळीज घायाळ कर,
तुझ्या गालची लाज उधळ
मला एकदाच नजरेत कैद कर

*************************************

मुका असला जरी कोणी
खुणा शब्दांच्याच करतो,
बहिर्‍यासही आवाजात
भास शब्दांचाच होतो

**************************************
-ऋतू

तुझ्याचसाठी...


तुझ्याचसाठी...

तू तहानली असताना
मी पाऊस होवून बरसावे,
अन पहाट तू होताना
मी धुके होवून पसरावे

उमलताना माझी फुले
ती पहाट तुझी मागती,
होवून वारा वाहतो मी
तुझ्याच रानाभोवती

तू किलबिलाट पक्षांचा
सांजेच्या घरट्यामधला,
मी सूर्य मावळतीचा
क्षितीजामधे लपलेला

तू ओळ कवितेमधली
मी शब्द तयाचा व्हावे,
तू ठेका शब्दांचा
त्याचा आशय मी व्हावे

वीजेसारखा स्पर्श तुझा
गात्रांचा थरकाप तुझ्यासाठी,
स्पंदनात अडकली तू
घे मिठीत जळण्यासाठी

मीपण माझे तूमय झाले
जगणे मरणे तुझ्याचसाठी,
तूच शरीर अन तूच आत्मा
मीही आता तुझ्याचसाठी

-प्रथमऋतू

Monday, January 17, 2011

A poem by Fazal Tabish describing communalism and fundamentalism in just 47 words!


नहीं चुनी मैंने ये ज़मीन जो वतन ठहरी

नहीं चुना मैंने वो घर जो खानदान बना
नहीं चुना मैंने वो मज़हब जो मुझे बख्शा गया
नहीं चुनी मैंने वो जुबां जिसमें माँ ने बोलना सिखाया
और अब मैं इन सब के लिए तैयार हूँ
मारने मरने पर
फज़ल ताबिश

काळोखाचं पाणी

थोडं कवितेविषयी...

हे एक पहाटगाणं आहे! ही कविता आम्हाला आवडण्याचं महत्वाचं कारण आहे ह्या कवितेतील रूपकं...



काळोखाचं पाणी

काळोखाचं पाणी पाणी, काळोखाचं पाणी
ढगामधे पोहतीया चांदव्याची राणी

सूर्याला बांधून केले तेजाचे धरण
किरणांचा कालवा हा वाहे नभातून
शेतामधे धावे आता ऊन अनवाणी...

बुब्बुळात हलतीये सावळी नजर
पापण्यांच्या पदराला केसांची ही जर
गालावर उगवली शुक्राची चांदणी...

शिट्टी वाजवीत फिरे आभाळात वारा
मुठी मुठी उधळतो चांदण्यांच्या गारा
हिरव्या हिरव्या पानावर दवाची मुरणी...

काळोख केशर झाले क्षितीज पिवळे
भुर्‍या भुर्‍या भुईवर सुगंधांचे तळे
पाण्यावर पसरली निळी निळी गाणी...

-किशोर पाठक.

भीती मेंदूत आरपार

थोडं कवितेविषयी...
आतंकवाद अथवा हिंस्त्रता किती नकळत आपल्या आजुबाजूला वावरत असते ह्याविषयीची तूर्तास ह्या कवितासंग्रहातील एक मन सुन्न करणारी कविता...


भीती मेंदूत आरपार



आता फारशी जत्रा भरत नाही,
भरलीच तरी
मुलं पुंग्या विकत घेत नाहीत,
घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक

मुलं कुठं खेळतात खेळपाणी
खेळतात युद्ध युद्ध

बैठकीतल्या उशांचा बांध रचून
पोरांनी एकदा
माझ्यावरच राखली स्टेनगन,
गोळीला घाबरलो नाही
पण चिमुकल्या डोळ्यात
हिंस्त्रतेचा आविर्भाव पाहून,
हातातली खोटी बंदूक
कधीही खरी होण्याची भीती
मेंदूत आरपार घुसत गेली.

-दासू वैद्य

Wednesday, December 29, 2010

सुटलो एकदाचा...

सुटलो एकदाचा...


दिवेलागणीची वेळ होती, शांततेचे साम्राज्य होते
पारावरचे बाकडे आज
एकटेच बसले होते...


एरवी दिसायची तिथे... दोन चार पांढरी डोकी
पण आज कुणाच ठाऊक 
तिथे कोणीच दिसत न्हवते 


त्या समोरच्या घरतील कंदिल आज अबोल होता
किर-किर करणा‍र्‍या खुर्चीचा आवाज
निपचित पडला होता.


आचानक एका आक्रोशाने त्या घरात प्रवेश केला
प्रकाशही कळोखामागे जाऊन लपला


मी पुन्हा तसाच पारापाशी आलो.
फांदीवरुन एक सुकलेले पान
माझ्या पायापाशी येऊन पडले, 
आणि म्हटले,
"सुटलो एकदाचा..."


-ऋतू