Wednesday, September 17, 2014

हे सुरांनो, चंद्र व्हा

नाट्यगीतांची मोहिनी कालातीत आहे! ह्याच सुवर्ण खजिन्यातून काही अप्रतीम पदे ब्लॉगवर टाकीत आहे... त्या नाट्यगीतांतील ’काव्याचा’आनंद लुटूया!

हे सुरांनो,
चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा

वाट
एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा

-
कुसुमाग्रज (ययाति आणि देवयानी)

तेजोनिधी लोहगोल

तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज
हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज

कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळितीअमृतकण
परि होऊन अणुरेणु उजळिती
तेजातच जनन-मरण, तेजातच नवीन साज
हे दिनमणी व्योमराज


ज्योतिर्मय मूर्ति तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा
दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा
होवो जीवन विकास वसुधेची राख लाज
हे दिनमणी व्योमराज

-
पुरषोत्तम दारव्हेकर (कट्यार काळजात घुसली)

गर्द सभोंती रान साजणी

गर्द सभोंती रान साजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?

 ती वनमाला म्हणे, "नृपाळा हे तर माझे घर
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर."

"रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी, तुला
तू वनराणी, दिसे भुवनी ना तुझिया रूपा तुला

अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी
भुलले तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरी"

-
बालकवी (मत्स्यगंधा)

कशि या त्यजू पदाला...

कशि या त्यजू पदाला
मम सुभगशुभपदाला

वसे
पदयुग जिथे हे
मम स्वर्ग तेथ राहे
स्वर्लोकि चरण हे नसती
तरि मजसि निरयवसती ती

नरकही
घोर सहकांता
हो स्वर्ग मला आता


-
विठ्ठल सीताराम गुर्जर (एकच प्याला)

प्रिये पहा...

प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा

थंडगारवात सुटत दीपतेज मंद होत
दिग्वदनें स्वच्छ करित अरुण पसरि निज महा

पक्षिमधुर शब्द करिति गुंजारव मधुप वरिति
विरलपर्ण शाखि होति विकसन ये जलरुहा

सुखदुःखाविसरुनियां गेलें जें विश्व लया
स्थिति निज ती सेवाया उठलें कीं तेंची अहा

- अण्णासाहेब किर्लोस्कर (संगीत सौभद्र)

Friday, August 1, 2014

या नभाने या भुईला दान दावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे

- ना. धो. महानोर

ज्यांची हृदये झाडांची

ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात
तेच वाढतात प्रकाश पितात तेच ऋतू झेलून घेतात

त्यांना मुळीच गरज नसते व्याख्यानबाज कंठांची
कानठळ्या बसवणार्‍या अध्यात्मिक घंटांची

त्यांना माणूस शिडी नसतो पाय ठेवून चढण्याची
त्यांच्या कुशित जागा असते हरलेल्याला दडण्याची

सत्तेवरती थुंकण्याचीही त्यांना मुळीच सवड नसते
निषकपट ऊन त्यांच्या खांद्यावर खेळत बसते

ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात
तेच फक्त गुच्छासारखा पावसाळा हुंगून घेतात

-
मंगेश पाडगावकर

जसे पावसाळे नभाशी बिभाशी

जसे पावसाळे नभाशी बिभाशी
तशी तूही माझ्या मनाशी बिनाशी


मनी पावसाळी 'मळब' साचले
तुझी याद आली मघाशी बिघाशी

किती साचला 'गोडवा' चेह-याशी
तुझी काय स्पर्धा मधाशी बिधाशी

कसा घास गिळती, तुझ्या चेह-याचा
लोचने जाहली का अधाशी बिधाशी

 तुला पाहता होत असे 'पेटपूजा'
कसा मजनू मरतो उपाशी बिपाशी 

जरी व्यक्त होते गझल बोलणारी
मौन साचलेले, तळाशी बिळाशी 

दिले ह्रदय तुही, दिले ह्रदय मीही
अता काय 'घेणे' जगाशी बिगाशी

-गुरु
(गुरुप्रसाद जाधव)

Wednesday, June 4, 2014

कधी कधी

कधी कधी भेटयोग असाच जुळून येतो,
कधी कधी अचानक मोगरा फुलून येतो

विचारही नसतो आग्रहही नाही,
पेपरमधे तसे भविष्यही नाही,
कधी कधी मंगळही गालात हसून घेतो...

छोटी भेट, छोटे संवाद, छोटेसे हसू,
सांगणे अपुले इतुकेच ’एकमेकांसाठी असू’
कधी कधी कुणाचे असणे कणा ताठ करून जातो...

घट्ट मिठी मारली का? नक्की माहित नसते,
आजवर कधी साधी मिठी मारलेलीच नसते,
कधी कधी ठोकाही क्षणात खंडकाव्य लिहून जातो...

जसे भेटणे तसेच निघणे अचानकच असते,
वळून पहायचे किती? काही बंधनही नसते,
कधी कधी ’कधी कधी’ चे आभार मानत बसतो...

-प्रथमेश किशोर पाठक

मित्र ?


ज्या कळ्या आहेत सडल्या त्या कधी खुलणार का
मी पणा जागृत ज्यांचा मित्र ते होणार का

दाखवावा चंद्र त्यांना ते नखुर्डे पाहती
भग्न त्यांच्या अंतराळी कृत्तिका दिसणार का

जाणताती हेच ते ज्वालाग्रही व्हावे कसे
जाळती सहवास ज्यांचे ऊब ते देणार का

ना मिळे त्याच्या मनातील अक्षरांना श्वासही
जे स्वत: स्फुरलेच नाही कधी लिहीणार का

गीत त्यांचे ऐकता थरकाप होई घाबरा
आत्मकेंद्री सूर यांचे ते मना भिडणार का

-प्रथमेश किशोर पाठक

हतबल

इच्छामरणी भीष्म जसा की
हतबल सारे झाले,
मरायचिही इच्छा आहे
पार्थ कुणा ना मिळे

झोपायाची हौस तरिही
झोप नसे काहिंची,
स्वप्न पाहुनी जागे होती
हतबल स्वप्ने यांची

काळजातला शब्द कधी
ना तोडून गेला तुरूंग
नात्यांखाली पेरीत गेले
हतबलतेचा सुरुंग

गाणे होते कसे विषारी
कळते ’ते’ गातांना
श्रुती यांच्या हतबल सार्‍या
स्वरांमधे दडलेल्या

जगण्यावरचे इंद्रधनू
हे पडे जरा तोकडे,
हतबल आहे तरिही जगती
हेही नसे थोडके!

-प्रथमेश किशोर पाठक

Wednesday, April 30, 2014

मोक्ष


" अथांग सागराच्या वितभर पाण्यावर तरंगणारी

माझ्या अस्थिंची राख मला म्हणाली,

इथे जन्म घ्यायला हवा होतास -

अशी राखेतून व्हावी आयुष्याची सुरुवात !

आणि मग चितेच्या अग्निदिव्यातून पार पडून

सरणावर उठून बसावं आत्मविश्वासानं…

म्हातार पावलांनी चालत जाऊन

विश्रांती घ्यावी आधीच

की मग बळकट खांद्यांवर तोलायचंय

कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच भलमोठ्ठं आभाळ…

असं स्वकर्तृत्व सिध्द करून झाल्यावर

फक्त एकच रंग फुलावा - गुलाबी - तरुणाईचा…

स्वप्नांच्या हिंदोळ्यांवर स्वार होऊन

मुक्तपणे उपभोगावी ती नवलाई…

मग वेध लागावे आईच्या कुशीचे

दुडूदुडू धावण्याचे, अवखळ वागण्याचे…

खूप लाड करून घ्यावे, खूप खूप गोंजारून घ्यावं

साऱ्यांचं लाडकं होऊन अंगाखांद्यावर खेळावं

आणि अंत जवळ येताच

हक्कानं तिच्या गर्भात शिरावं…

शेवट असा निरागस व्हावा

त्या वितभर जागेत तरंगतानाच मोक्ष मिळावा…

अथांग सागराच्या वितभर पाण्यावर तरंगणारी

माझ्या अस्थिंची राख मला म्हणाली,

ओला झालास तर उडता येणार नाही…

कोरडं राहून बुडता येणार नाही…

चल, लवकर ठरव काय करायचंय ते…! "

- अमेय घरत

सवय


जगाच्या गोंगाटाची सवय झालीये आता
स्वार्थाच्या हुंदक्यांच ते उत्स्फुर्त रडणं, सहन होतय आता...
सवय लागलिये आता त्या निष्पाप स्वप्नांना
अंथरुणातच चुरगळण्याची ....
सवय झालिये आता त्या काजळी लागलेल्या सूर्याची,
सत्याचं तेज हरवलय त्यांच्या पैशांच्या अंधार्‍या कोठडीत...
सवय झालिये आता हरवलेला इतिहास पुन्हा पुन्हा शोधण्याची
नाही सापडत तो कृष्ण...
बहिरेपणाच्या युगात संपलीये गीता...
ह्या गर्दीच्या कल्लोळात सवय लागलिये
वास्तववादी जगत अवास्तवपणे जगण्याची....
जगण्याच्या काळोखात हरवल ते तेजस्वी मरणसुद्धा...
आणि सवयच झालिये आता
मानवतेच्या तिरडीवरील ह्या निरागस काव्यसुमनांची...

-अमोल देशमुख

बाई ...


भावनांची झाक थोडी ओल बाई ;
येथल्या नियमात आता बोल बाई ..

ऊन वारा पावसाळा झेलणारी ;
जाणतो मी जखम आहे खोल बाई ..

माय, मैत्रिण,लेक होते बहिण सुद्धा ;
तू किती करशील येथे रोल बाई ?

तू अनिच्छेने स्वत:ला कोंड आता ;
चांगला नाहीच हा माहोल बाई ...

हासण्याचे घेतले मक्ते तयांनी ;
तूच भरते आसवांचा टोल बाई ...

वेल घेते हात हाती मांडवाचा ;
सोडला की हात जातो तोल बाई ...

हा तुझा मोठेपणा आहे धरेचा ;
तू दिले आहे क्षमेला मोल बाई ...

ऐकु ना यावीच किंकाळी तुझी ती ;
याचसाठी वाजती ते ढोल बाई ..

-कमलाकर देसले

Tuesday, March 18, 2014

मनाचा दगड

गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
आता माझ्या पास कळ्या
आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे आता ओझे
रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा

-आरती प्रभु

हासायाचे आहे मला

हासायाचे आहे मला
कसे? कसे हासायचे?

हासायाचे आहे मला
हासतच वेड्य़ा जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे कधी आणि कुठे
कसे आणि कुणी पास
येथे भोळ्या कळ्यांनाही
येतो आसवाचा वास

-आरती प्रभु

एका रिमझिम गावी

एका रिमझिम गावी
भरून आहे हृदयस्थ तान
पण
स्वगत विसरून
तिथे जाता यायला पाहिजे!

चालून जाता येण्यासारखी
पायतळी आहे माती
पण
जाणं न जाणं
तरी कुणाच्या हाती?

-आरती प्रभु

Monday, February 10, 2014

उगवत्या सूर्याचा शोध...


चोहीकडे पेटला वणवा
विझता विझेना
काय करावे आता माझ्या मना कळेना..

मी लाख केले प्रयत्न
जळायचे ते जळले
मन माझे निखार्यात पोळले..

आता विखुरली राख
शोधतो आहे
अस्थी मनाच्या मीच वेचतो आहे..

कसे घडले का कळेना
ठिणगीचा उगम
मिळता मिळेना..

आता शोधतो धुरात
क्षितीज नवे पण
उगवता सूर्य कुठेच दिसेना...


-ऋतू

कोळी...


भावनांच्या जाळ्यात अडकलेला मी
जसा कोळ्यानी अपल्याभोवती विणलेल्या जाळ्यात
अडकलेला किडा...

स्वत:भोवती नात्यागोत्यांचे सुंदर जाळे विणताना कोणाला
माहीत असतं की
ह्यातला कोळी आपण स्वत: नसून आपले इष्ट?
जे अजस्त्रपणे आपल्यावर मात करतात
आणि
आपल्या जाळ्यावर राज्य करतात...आपल्या नकळत

And one fine day आपल्यालाच गिळून टाकतात,
खाऊन टाकतात,
बंदी बनवतात...आपल्याच राज्यात

आता मी
अस्तित्वहीन,
भावनाशून्य,
परग्रही वावरणारा तुच्छ किडा...
.
.
.
स्वत:च्याच ग्रहावर स्वत:चं शारिरीक अस्तित्व संपेपर्यंत!


-ऋतू

Friday, January 10, 2014

मार्ग

चालतो मी सारखा हा चालण्याला अंत नाही
चाललो कोठे? कशाला?,ही ही आता खंत नाही

एकदा पूर्वी मलाही वेड होते शोधण्याचे
वेदनेवाचून काही लाभ झाला त्यात नाही

जाणत्या थोराकडेही खूप केली चौकशी मी
शब्द ज्याला तून कळले अज्ञतेला पार नाही

योजनेचा या नकाशा ज्या ठिकाणी ठेवलेला
खंदकाने वेढलेल्या त्या स्थळाला दार नाही

ना कळावे हीच इच्छा जो कुणी आहे तयाची
शोधता त्याच्या कृपेचा शोधका आधार नाही

मी म्हणोनी सोडला तो नाद आता मंझिलाचा
चालण्याचे श्रेय आहे अन्य धर्माचार नाही

-
कुसुमाग्रज

स्मृतिगीत

(या कवितेला उत्तर-रामचरित्राची पार्श्वभुमी आहे)

आठवतो का सांग सखे तो काळ विवाहाचा
बाळपणाचा मुक्तपणाचा निर्मळ भावाचा

संसाराचे चित्र चिमुकले चिमुकलेच जीव
फुलले नव्हते हृदयांचे ते राजस राजीव

पहात होते तात तदा त्या लीला बाळांच्या
जणू आठवती त्यासही लीळा त्याच सुकाळाच्या

जपती पदोपदी प्रसन्न हृदया पुण्यमया माता
गेले ते दिन सीते यापरि हा बघता बघता

बालपणाचे प्रसंग जणु ते फिरती घडती आज फिरुनी
चित्रपटा या अश्रुजलाने चल टाकू धुवुनी

ती सीता तू तोच राम मी त्याच आज माता
परि जे गेले ते दिन आता येतिल का हाता

कशास आशा आता नसती झाले ते गेले
सुकले फुल न वास देत जरी अश्रुंनी भिजले

-
गोविंदाग्रज