Thursday, May 16, 2013

बा.सी. मर्ढेकर

(मर्ढेकर यांच्या कवितांना ते नाव देत नसत. त्यांच्या काही कविताया दुसर्‍या काव्यसंग्रहातून. गिरणीकामगाराच्या दैनंदिन जीवनाचे चित्र, त्यातील तोचतोचपणा, त्यांची हतबलता यावरील एक सुंदर
अन मार्मिक कविता
)

काळ्या बंबाळ अंधारी
धपापते हे इंजिन
;कुट्ट पिवळ्या पहाटी
आरवतो दैनंदिन
भोंगा
-
"घन:शामसुंदरा श्रीधरा गिरिणॊदय झाला,
उठी लवकरी दिनपळी......."- गोंगाटला सारा

कामगारवृंद आणि
कोंबटशा पिळी धारा
यंत्रावर चक्रपाणि
घामाघुम
-
"कुत्रापि पतितं तोयं यथा गच्छति सागरम,
सर्वचक्रभ्रमस्कारं मालकं प्रति गच्छति."- काळे पुच्छ

लपवुनि पायी, गर्दइथे वस्तित गलिच्छ
भों भों भुंके लालजर्द
संध्याकाळ
.
"शुभं करोति कल्याणं दारिद्र्यं ऋण-संपही
शुद्धबुद्धीविनाशाय भोंगाकुत्री नमोSस्तु ते."

  -बा.सी. मर्ढेकर

घन लवला रे

घन लवला रे, घन लवला रे
क्षणभर श्रावण स्रवला रे!
जरतारांचा खुलून मांडव
अनल जिवींचा निवला रे!

चारा हिरवा हिरवा रे
वर उदकाचा शिरवा रे
मनातले सल रूजून त्याचा
आता झाला मरवा रे!

हरखुन जळ हे निवळे रे
गगन उन्हाने उजळे रे
अहा! शहारून पुनश्च मीही
पवन-पिसोळे पिवळे रे!
-
बा..बोरकर

उबगेवर इलाज आहे

(दैनंदिन आयुष्य कंटाळवाणं झालं असेल तर विंदा तुम्हाला ते वाहतं करण्याचे उपाय सांगताय)

जिव्हेवरली चव गेली
डॊळ्यामधली बाहुली मेली
नाडीमधे पडल खंड
कमरेखाली सगळे थंड

उबग झाली काय फिकीर
धरा धीर धरा धीर
उबगेवर इलाज आहे
मृत्यूलाही लाज आहे

न्हालेलीचे ओले केस
समुद्राचा सफेद फेस
बालकांचे गुबरे गाल
जांभीवरचे जांभू लाल

शहाळ्यामधला जीवनरस
हापूस आंबे कापे फणस
मंद मंद रातराणी
धुंद धुंद गोड गाणी

अश्वत्थाची पाळे सात
थोडा चुना थोडा कात
आत्मा खल जाणीव बत्ता
यांच्यावरती बसव सत्ता

अवघे विश्व खळात भर
ढवळ ढवळ काढा कर
आता सांगतो पथ्ये सारी
शाकाहारी मांसाहारी

घट्ट दही जीरगा भात
सात भाज्या चटण्य़ा सात
तुपाळ पुलाव रसाळ नळी
पाण्यामधे गुलाबकळी

संगित चिवडा कोल्हापुरी
पुण्यामधली मिसळ बरी
निदान निदान हे मिळेल
मुंबईची मवाळ भेळ

जगण्यामधे पाहिजे अर्थ
पथ्याशिवाय औषध व्यर्थ
पाहिजे व्यायाम निदान थोडा
खुर्चीचा हा सोड खोडा

हिरवे हिरवे अफाट माळ
यांच्यावरून रांगे काळ
भुरे डोंगर निळे आकाश
लाल क्षितीज पिंगट प्रकाश

कर सैल तुमान तंग
मातीवरती घास अंग
हिरव्या गवतावरचा माज
चढेल त्याला कसली लाज

घामामधे भिजव माती
दगडासंगे झिजव छाती
आकाशावर मार मुठ
उबग बिबग सर्व झूठ

अजुनही आशा आहे
उबगेवर इलाज आहे
मृत्यूलाही लाज आहे....
-
विंदा करंदीकर