Thursday, July 11, 2013

जीवन त्यांना कळले हो…

जीवन त्यांना कळले हो
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो
चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो
दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो
सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो
उरीच ज्या आढळले हो!
-
बा. . बोरकर

Friday, July 5, 2013

तो

दिवाणखान्यात बसून
चारचौघांच्या संगतीत
मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकरतो
तेव्हा आकाशाचे एक दार
किलकिले करून
तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने ,
कुतूहलानेही
आणि सगळे गेल्यावर
तार्‍याच्या अंधूक प्रकाशात
तू उतरतोस माझ्या एकांतात
आणि समोरच्या खुर्चीवर बसून
म्हणतोस- अभिनंदन
तुझे विवेचन छानच होते
इतके की मलाही शंका आली
माझ्या अस्तित्वाची-
पण तरीही मला माहिती आहे
मला मानणार्‍यांमधे
तू अग्रेसर आहेस
फक्त तुझा दिवाणखाना
तुझ्या काळजपासून
फार दूर आहे, इतकेच.
-
कुसुमाग्रज

रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो

रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो
जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो

सांत्वनांना तरी ह्र्दय होते कुठे?
रोज माझेच मी मन चिणत राहिलो

ऐकणारे तिथे दगड होते जरी
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो

शेवटी राहिले घर सुनेच्या सुने
उंबर्‍यावरच मी तणतणत राहिलो

ऐनवेळी उभे गाव झाले मुके;
मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो

दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो

मज न ताराच तो गवसला नेमका...
अंबरावर मी वणवणत राहिलो

-सुरेश भट