Thursday, May 16, 2013

उबगेवर इलाज आहे

(दैनंदिन आयुष्य कंटाळवाणं झालं असेल तर विंदा तुम्हाला ते वाहतं करण्याचे उपाय सांगताय)

जिव्हेवरली चव गेली
डॊळ्यामधली बाहुली मेली
नाडीमधे पडल खंड
कमरेखाली सगळे थंड

उबग झाली काय फिकीर
धरा धीर धरा धीर
उबगेवर इलाज आहे
मृत्यूलाही लाज आहे

न्हालेलीचे ओले केस
समुद्राचा सफेद फेस
बालकांचे गुबरे गाल
जांभीवरचे जांभू लाल

शहाळ्यामधला जीवनरस
हापूस आंबे कापे फणस
मंद मंद रातराणी
धुंद धुंद गोड गाणी

अश्वत्थाची पाळे सात
थोडा चुना थोडा कात
आत्मा खल जाणीव बत्ता
यांच्यावरती बसव सत्ता

अवघे विश्व खळात भर
ढवळ ढवळ काढा कर
आता सांगतो पथ्ये सारी
शाकाहारी मांसाहारी

घट्ट दही जीरगा भात
सात भाज्या चटण्य़ा सात
तुपाळ पुलाव रसाळ नळी
पाण्यामधे गुलाबकळी

संगित चिवडा कोल्हापुरी
पुण्यामधली मिसळ बरी
निदान निदान हे मिळेल
मुंबईची मवाळ भेळ

जगण्यामधे पाहिजे अर्थ
पथ्याशिवाय औषध व्यर्थ
पाहिजे व्यायाम निदान थोडा
खुर्चीचा हा सोड खोडा

हिरवे हिरवे अफाट माळ
यांच्यावरून रांगे काळ
भुरे डोंगर निळे आकाश
लाल क्षितीज पिंगट प्रकाश

कर सैल तुमान तंग
मातीवरती घास अंग
हिरव्या गवतावरचा माज
चढेल त्याला कसली लाज

घामामधे भिजव माती
दगडासंगे झिजव छाती
आकाशावर मार मुठ
उबग बिबग सर्व झूठ

अजुनही आशा आहे
उबगेवर इलाज आहे
मृत्यूलाही लाज आहे....
-
विंदा करंदीकर

No comments:

Post a Comment