Wednesday, May 16, 2012

मी भणंग झालो...

(प्रेमाची उत्कट भावना... स्वत्वाला विसरून प्रेम करणं आणि फक्त प्रेयसी-प्रियकरापूरतं प्रेम मर्यादीत न ठेवता ते विश्वातीत करणं अशा प्रेम भावनेतील किशोर पाठक यांची गज़ल... )


मी भणंग झालो तुझिया स्पर्शातून फिरता फिरता
लावतो लग्न कवितांचे अक्षरे उधळूनी आता

गे तुझा स्पर्श होताना गुलमोहोर हिरवा होतो,
मी सूर्य तांबडा झालो रक्तिमा प्राशूनी घेता

बांधले सदन गगनाचे, लाविल्या छ्तावर तारा,
अन अंगण झाले अपुरे पृथ्वीवर येता येता


आगीवर जाळीत गेलो षडरिपूस औदार्याने,
शत्रूस म्हणालो ’स्वामी’ राखेतून उरता उरता

 
नात्यात अडकलो तेव्हा मी कुणाकुणाचा होतो?
बेछूट बहकलो आणि विश्वाचा झालो त्राता

मी देह सोडीला तेव्हा ते मडके फोडीत होते,
मी हसलो भस्मांगाने ज्वाळात लपेटून घेता

वाद्यात कोंबले त्यांनी ते राग, सूर समयांचे
हातावर तेव्हा माझ्या कोवळा षड्जही होता

येवोत कितीक लुटारू कातडी सोलण्यासाठी
बघ जगण्याचा कारंजा जखमेतून उसळत होता

अभ्रातून लुकलुकणारा कोवळ्या दवांत कसाही
उगवला दीस सृजनाचा ओठातून गाता गाता

अद्वैत उसासा होतो दोघांचा दोघांसाठी
कायेचा कापूर झाला चैतन्यस्पर्श तू करता

-किशोर पाठक

गुलमोहोर

(प्रेम निसर्गातही असतं आणि कवीच्या नजरेतून बघितल्यास त्या प्रेमाचं रूपांतर एका लग्नासारख्या घट्ट नात्यातही परावर्तीत होवू शकतं. उषातनय च्या ह्या कवितेतून काही अप्रतीम उपमा आपल्याला बघायला मिळतील...)


आता पावसा मातीशी कर लगीन साजरं,
गुलमोहोराचं कुकु तिच्या भांगामधी भर

बाभळीच्या हळदीनं व्हावा हळद सोहळा
गळा घालाया मातीच्या आण गारांच्या तू माळा
तुझी निघू दे वरात, बिजलीच्या तालावर

अक्षदाही टाकतील झाडं वाळल्या पानांच्या
ये रे पावसा म्हणता टाळ्या लागाव्या जनांच्या
उन्हाचाही अंतरपाट, व्हावा क्षणामधी दूर

माती येड्या आनंदानं जाइल दरवळून
तू घेताना कवळून लाजेल हिरवळून
तुमच्या मधूचंदराला, येवो जांभळा अंधार

अशी फुलव सईला व्हावा प्रेमानं प्रणय
यावे जन्माला तुमचे जणू पिकत तनय
वहळाच्या दूधधारा, व्हावे डोंगर उभार

कधी पावसा मातीला फारकत नको देऊ
तिच्या आधाराला राहो तुझे आभाळाचे बाहू
सूर्य लावील नादाला, तुला बोलावील वर
तरी पावसा तू तवा सोडू नको रे संसार
गुलमोहोराचं कुकु तुझं ठरू दे रे खरं

-उषातनय (प्रशांत केंदळे)

नशा

(Break-up झाल्यावर एक प्रियकर आपल्या प्रेयसीला विसरण्यासाठी नशेचा आधार घेतो पण ते प्रेम त्याला तिच्या धुंदीतून बाहेर पडू देत नाही. आभिजीत विठ्ठल शिंदे या कवीने विनोदी अंगाने मांडलेला हा एक ’नशेच्या मार्गावरील विरहप्रवास’...)


तुला विसरण्यासाठी मी खरच खूप प्रयत्न करतोय
नशेच्या ह्या खड्ड्यामधे माझ्या स्व:तालच पुरतोय

म्हणे दारूत विसरतात सारं म्हणून दारु प्यायली होती
पण घशापर्यंत ढोसूनही मला शेवटी तुझीच आठवण आली होती
आता एका प्याल्याने विसरत नाही म्हणून मी दुसरा प्याला भरतोय

सिगारेटच्या धुरात धुसर होतील आठवणी म्हणून सिगारेट शिलगावली होती
पण तिथेही प्रत्येक झुरक्याच्या धुरान तुझीच छबी बनवली होती
आता ती छबी तोडण्यासाठी मी अजुन एक झुरका ओढतोय

गुटखा, चरस, गांजा असं सारं काही झालं होतं
तू काही दूर गेलिच नाहीस पण मरण मात्र आलं होतं
आता मरणाची वाट बघत बघत मी सारं काही बाजूला सारतोय

कोणीतरी म्हणायचं माणूस गेल्यावरती सोबत काही नेणार नाही
आता नाही नशा करावा लागणार कारण मेल्यावर तुझीही आठवण येणार नाही
ह्या आनंदात मी अजून एक बाटली फोडून दुसरी सिगारेट शिलगावतोय

-अभिजीत विठ्ठ्ल शिंदे