Monday, August 29, 2016

शुद्धी


मी ओंजळ पसरली आहे
त्वचा लिंग व्यवहार विचार वैगेरे
अशुद्ध झाले तर
मन शुद्धी पावेल का?
आणि त्वचा लिंग व्यवहार विचार वैगेरे
शुद्ध ठेवले जरी
मन शुद्धी पावेल का?
ह्या पवित्र-अपवित्र, शुद्धी-अशुद्धीच्या
व्याख्या ज्याने रचल्या
त्याने नक्कीच अनुभवली असेल
ती अशुद्धी
त्याच्यापाशी जर उरली असेल
थोडी शुद्धी
मी ओंजळ पसरली आहे...!!

- अमेय घरत

उन्हाचा...

जन्मभर तुडवेन मी रस्ता उन्हाचा
पण तुला स्पर्शू नये ठिपका उन्हाचा

यामुळे तर ऊन्ह हे जळते तुझ्यावर
रंग नाही एवढा गोरा उन्हाचा

मी जशी खिडकी उघडली, आत आला
केवढ्या वेगामधे तुकडा उन्हाचा

दग्ध ओठांनी तुझ्या केसांमधे मी
माळला होता कसा गजरा उन्हाचा

घालतो पायामधे चपला धुळीच्या
हिंडतो बांधून तो पटका उन्हाचा

राहते माझ्यासवे छायेप्रमाणे
जीव माझ्यावर कसा इतका उन्हाचा

दिवस ढळला, सांज झाली पण अजुनही
उडत आहे मंदसा धुरळा उन्हाचा

- वैभव देशमुख

चार तुझ्या शब्दांनी साध्या...

चार तुझ्या शब्दांनी साध्या टळून जाइल नकारसुद्धा
एखाद्या झुळुकीचे होइल आनंदाने वादळसुद्धा

सारी किरणे परतत नाहित सूर्याच्या हाकेवर आता
एखादा चांदणीत रमतो वयात आला नसूनसुद्धा

बुडबुड्यास ज्या रुबाब होता ,तो बुडला पण विरला नाही
त्याच्यामधला कणा हवेचा टिकलेला...कडकडूनसुद्धा

सरण व्हायचे होते म्हणून अचेत झाली होती झाडे...
पाणी देणारा गेल्यावर.... अर्थ काय मग जगूनसुद्धा

कडाडली जी वीज तिने तर लाखो ढग बेचिराख केले
मोरपिसारा तंद्रीमध्ये नाचनाचला.... भिजूनसुद्धा

तुझ्या नि माझ्या नात्यावरती टपून आहे दुनिया सारी
झाली आहे जगात अफवा  जवळ जवळ पसरवूनसुद्धा

तिच्या जीवघेण्या मैत्रीने... पुढे जीव घेतलाच  माझा
होकारावर शिक्कामोर्तब.... 'नाही नाही' म्हणूनसुद्धा

- प्रथमेश तुगांवकर

जे कधी घडणार नव्हते...

जे कधी घडणार नव्हते तेच घडले वाटते
आज आभाळा तुझे आभाळ पडले वाटते

शांत झाले वाहणे घोंगावणे, इतके कसे?
वादळाचेही तिच्यावर प्रेम जडले वाटते

बहरणे जमलेच नाही फार फुटली पालवी
की  ऋतुंचे  वागणे  वेलीस नडले वाटते

भेटले दोन्ही किनारे ना कुणा दिसले कधी
भेटणे  त्यांचे  प्रवाहा  आड  दडले वाटते

तो दगड असुनी तयाला केवढे गेले तडे
प्रेम खाली आज दगडाच्या चिरडले वाटते

मी उन्हे लिहिली वहीचे पान मग आेले कसे?
मी कधी रडलोच नाही शब्द रडले वाटते

- बंडू  सुमन अंधेरे 

देव आहे, फूल आहे, हार आहे

देव आहे, फूल आहे, हार आहे !
मांडला त्यांनी खुला व्यापार आहे !!

मज नको तो चार शब्दांचा दिलासा,
तू दिलेला तो दिलासा फार आहे !!

तू कशाला पाहते डोळ्यात माझ्या
कोंडला डोळ्यात मी अंधार आहे

संत झाले...पंत झाले कैक येथे
पण तरीका रोज हा व्यभिचार आहे ?

बोलला माझ्याच मधला शब्दवेडा
वेगळा माझ्या मधे गुलजार आहे

मुक्त केल्या मी जरा माझ्या दिशा अन,
पेटला माझ्या मनी एल्गार आहे

सत्य जेथे... देव तेथे नांदतो बघ,
सुबक मूर्ती फ़क्त तर आकार आहे 

          -शशिकांत कोळी(शशी)

Thursday, January 21, 2016

देव...


वारा घोंघावत शिरतो शहरभर हत्तींच्या प्रचंड झुंडीसारखा
शहरातल्या मोठ्याच मोठया ईमारती
कापून काढतात वार्याची झुंड...मधोमध
ईमारतींच्या दारं-खिडक्यातून वारा गाळून निघतो...
आता पुढच्या ईमारतीसाठी उरलेली असते
वार्याची एक झुळूक आणि शेवटली ईमारत उकाड्याने हैराण!

आजची तरूण पिढी फारशी देव-देव करत नाही

आपण तयार केल्यात धर्मांच्या भिंती,
त्याला लावली दारं-खिडक्या जाती-पातीची

देव वार्यासारखा वाहत राह्तो...
देव पातळ होत जातो...

-प्रथमेश किशोर पाठक.


माझी कधीही न झालेली कविता -


कुंडलिनीसारखी सळसळत राहते ती माझ्या भावविश्वात,
जीवनातील प्रत्येक सत्यासमोर मला नागवं करून
दाखवून देते त्यांची व्यर्थता...
थकून झोपलेल्या गणिकेला जसा
माडीवरल्या चांदण्यात माधवाचा भास व्हावा,
तशी अवतरते ती माझ्या काळजाच्या धुपदाणीत...
पण तिला नको असते पूजा-अर्चा आरती
तिला, मला मुक्तता नकोच असते मुळी...
ती माझ्यात शिरून मोकळी होईपर्यंत
मी अलिप्त झालेला असतो तिच्यातून,
मी तिच्यात मुरून मोकळा होईपर्यंत
ती अलिप्त झालेली असते माझ्यातून...
मिलनाने एकमेकांच्या शोधाची तीव्रताच संपेल याची भीती वाटून
ती माझ्या मेंदूच्या कोणत्याश्या काळोख्या बधिर समाधी गुहेतून
धावत सुटते निळ्या जांभळ्या जटा विस्फारून
आणि मी क्षणभंगूर जगण्याचा तंतू घट्ट पकडून पृथ्वीवरच बसून राहतो
निष्कारण निष्फळ वांझोटी कूस कुरवाळत…

- अमेय घरत