Wednesday, February 13, 2013

जवळपणाचे झाले बंधन

(प्रेमातलं जवळपण पंखांच बंधन ठरू नये... व्यक्तित्वशून्य करणारं ठरू नये...)

इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन

छेडणार जर होतो आपण गीत नवे तर
हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर
धुंदपणी त्या अंधपणी त्या भान राहिले नाही हे पण...

मोह फुलांपरी तेव्हाचे ते क्षण दरवळले
गंधीत उन्मद त्या अंधारी काही न कळले
नव्हते जाणीव होईल म्हणून श्रृंखलाच हे मधू अलिंगन...

भरून राहिलीस तूच माझिया नेत्रामधूनी
निद्रेमधूनी, स्वप्नामधूनी, जागृतीतुनी
कळले आता असून डॊळे नव्हती दृष्टी नव्हते दर्शन...

गुंफियलेले कर हे झाले पहा साखळ्या
मीलन कसले जे न बघू दे दिशा मोकळया
खोल उरी कुणी तडफडले पण जाणवले नच ते आक्रंदन...

निकट असूनही श्वासापुरते दूर असावे
जवळपणातही पंखाना आकाश दिसावे
हवे वेगळेपण काहीतरी मीलनातही सखे आपुल्यातून...

जवळ जवळ ये पण सीमेचे भान असूदे
रात्र असो पण पहाटही वेगळी दिसू दे
स्वरजुळणीतून एक गीत तरिच हवेच अंतर सात सूरांतून...

-
मंगेश पाडगांवकर  

No comments:

Post a Comment