Wednesday, February 13, 2013

फुंकर

(वंचित झालेल्या प्रियकराने आता आपल्याप्रमाणे प्रेयसीही दु:खात आहे की नाही हे पहायला तिच्या घरी जाऊ नये... विदारक अनुभव येऊ शकतात...)

बसा म्हणालीस म्हणून मी बसलो
तू हसली म्हणून मी हसलो
बस्स इतकच...
बाकी मन नव्हतं था‍र्‍यावर
दारवरचा पडदा दपटीत तू निघून गेलिस माजघरात
माझ्यासोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या

ह्या जाळीच्या पडद्यात कशाला कोरलं आहेस हे हृदय
उलटं...उत्तान...
काचेच्या कपाटात कशाला ठेवल्या आहेस
भुश्यच्या राघू- मैना...
उडता आहेत लाकडी फळ्यावर कचक्ड्याची फुलपाखरं
आणि भिंतीवर रवि वर्म्याची पौष्टीक चित्रं
काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा
यातील एक टाका चुकली असतीस
तरी मी धन्य झालो असतो!

तू विचारलस, ’काय घेणार?’
काय पण साधा प्रश्न आहे... ’काय घेणार?’
देणार आहेस का ते सारं पूर्वीच
मला हवे आहेत चिंचेचे आकडे ते,
ते अधाशी ओठ, ती कुजबुज, त्या शपथा
दे झालं कसलही साखरपाणी!’
तुझं आणि तुझ्या पतीच हे छायाचित्र छान आहे
तुझ्यावरची सगळी साय ह्या फुगीर गालांवरून ओसंडून वाहतीये
बळकट बाहू, रूंद खांदे, डोळ्यात कर्तेपणाची चमक छान आहे
राग येतो तो तुझा
या चित्रात तू अशी दिसतेस अशी दिसतेच
जसं काय कधी झालच नाही...
मी तुला बोलणार होतो छद्मीपणाने,
निदान एक वाक्य,
एक जहरी बाण,
निदान एक... पण ते मला जमलं नाही
आणि तू तर नुसतीच हसत होतीस!

आता मला एकच सांग
उंबर्‍यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं,
इतकी का तुला सुपारी लागली?
पण
नकोच सांगू
तेवढीच माझ्या मनावरती एक फुंकर!
-
वसंत बापट  

No comments:

Post a Comment