Friday, July 5, 2013

तो

दिवाणखान्यात बसून
चारचौघांच्या संगतीत
मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकरतो
तेव्हा आकाशाचे एक दार
किलकिले करून
तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने ,
कुतूहलानेही
आणि सगळे गेल्यावर
तार्‍याच्या अंधूक प्रकाशात
तू उतरतोस माझ्या एकांतात
आणि समोरच्या खुर्चीवर बसून
म्हणतोस- अभिनंदन
तुझे विवेचन छानच होते
इतके की मलाही शंका आली
माझ्या अस्तित्वाची-
पण तरीही मला माहिती आहे
मला मानणार्‍यांमधे
तू अग्रेसर आहेस
फक्त तुझा दिवाणखाना
तुझ्या काळजपासून
फार दूर आहे, इतकेच.
-
कुसुमाग्रज

2 comments: