(या कवितेला उत्तर-रामचरित्राची पार्श्वभुमी आहे)
आठवतो का सांग सखे तो काळ विवाहाचा
बाळपणाचा मुक्तपणाचा निर्मळ भावाचा
संसाराचे चित्र चिमुकले चिमुकलेच जीव
फुलले नव्हते हृदयांचे ते राजस राजीव
पहात होते तात तदा त्या लीला बाळांच्या
जणू आठवती त्यासही लीळा त्याच सुकाळाच्या
जपती पदोपदी प्रसन्न हृदया पुण्यमया माता
गेले ते दिन सीते यापरि हा बघता बघता
बालपणाचे प्रसंग जणु ते फिरती घडती आज फिरुनी
चित्रपटा या अश्रुजलाने चल टाकू धुवुनी
ती सीता तू तोच राम मी त्याच आज माता
परि जे गेले ते दिन आता येतिल का हाता
कशास आशा आता नसती झाले ते गेले
सुकले फुल न वास देत जरी अश्रुंनी भिजले
-गोविंदाग्रज
No comments:
Post a Comment