Wednesday, April 30, 2014

बाई ...


भावनांची झाक थोडी ओल बाई ;
येथल्या नियमात आता बोल बाई ..

ऊन वारा पावसाळा झेलणारी ;
जाणतो मी जखम आहे खोल बाई ..

माय, मैत्रिण,लेक होते बहिण सुद्धा ;
तू किती करशील येथे रोल बाई ?

तू अनिच्छेने स्वत:ला कोंड आता ;
चांगला नाहीच हा माहोल बाई ...

हासण्याचे घेतले मक्ते तयांनी ;
तूच भरते आसवांचा टोल बाई ...

वेल घेते हात हाती मांडवाचा ;
सोडला की हात जातो तोल बाई ...

हा तुझा मोठेपणा आहे धरेचा ;
तू दिले आहे क्षमेला मोल बाई ...

ऐकु ना यावीच किंकाळी तुझी ती ;
याचसाठी वाजती ते ढोल बाई ..

-कमलाकर देसले

No comments:

Post a Comment