Monday, January 17, 2011

भीती मेंदूत आरपार

थोडं कवितेविषयी...
आतंकवाद अथवा हिंस्त्रता किती नकळत आपल्या आजुबाजूला वावरत असते ह्याविषयीची तूर्तास ह्या कवितासंग्रहातील एक मन सुन्न करणारी कविता...


भीती मेंदूत आरपार



आता फारशी जत्रा भरत नाही,
भरलीच तरी
मुलं पुंग्या विकत घेत नाहीत,
घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक

मुलं कुठं खेळतात खेळपाणी
खेळतात युद्ध युद्ध

बैठकीतल्या उशांचा बांध रचून
पोरांनी एकदा
माझ्यावरच राखली स्टेनगन,
गोळीला घाबरलो नाही
पण चिमुकल्या डोळ्यात
हिंस्त्रतेचा आविर्भाव पाहून,
हातातली खोटी बंदूक
कधीही खरी होण्याची भीती
मेंदूत आरपार घुसत गेली.

-दासू वैद्य

No comments:

Post a Comment