Monday, January 17, 2011

काळोखाचं पाणी

थोडं कवितेविषयी...

हे एक पहाटगाणं आहे! ही कविता आम्हाला आवडण्याचं महत्वाचं कारण आहे ह्या कवितेतील रूपकं...



काळोखाचं पाणी

काळोखाचं पाणी पाणी, काळोखाचं पाणी
ढगामधे पोहतीया चांदव्याची राणी

सूर्याला बांधून केले तेजाचे धरण
किरणांचा कालवा हा वाहे नभातून
शेतामधे धावे आता ऊन अनवाणी...

बुब्बुळात हलतीये सावळी नजर
पापण्यांच्या पदराला केसांची ही जर
गालावर उगवली शुक्राची चांदणी...

शिट्टी वाजवीत फिरे आभाळात वारा
मुठी मुठी उधळतो चांदण्यांच्या गारा
हिरव्या हिरव्या पानावर दवाची मुरणी...

काळोख केशर झाले क्षितीज पिवळे
भुर्‍या भुर्‍या भुईवर सुगंधांचे तळे
पाण्यावर पसरली निळी निळी गाणी...

-किशोर पाठक.

No comments:

Post a Comment