Tuesday, April 26, 2011

नको नको रे पावसा ...!! - इंदिरा संत

पावसाच्या येण्याने तारांबळ उडालेली एक स्त्री, नंतर पावसाला विनवते की तू इथे न कोसळता आठ कोस लांब वेशीजवळ जा आणि माझा सखा जो जायला निघाला आहे त्याला माघारी बोलव... पावसाला घातलेलं इतकं गोजिरवाणे साकडे विनापावसाचेही डोळे ओलावून जातं...अलगद...



नको नको रे पावसा ...!!

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंदमौळी
आणि दारात सायली;

नको नाचू तडातडा
असा कौलारावरन,
तांब सतेलीपातेली
आणू भांडी मी कोठून?

नको करू झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारातून,
माझे नसेूचे जुनेरे
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
तयाला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळयांत
तुझ्या विजेला पाजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंदमौळी
आणि दारात सायली....

- इंदिरा संत

3 comments: