Monday, April 23, 2012

नि:शब्दता

किती बरं झालं असतं,
रस्त्याच्या बाजुला शहरं वसवता आली असती तर...
कमीत कमी अंधारात घर शोधायची तरी जबरदस्ती झाली नसती

किती बरं झालं असतं
जर नात्यांच्या भोवती चिटकवता आली असती माणसं Price Tag सारखी...
कमीत कमी बुधवारचा बाजार तरी रंगला असता

किती बरं झालं असतं
जर डोळ्यात रंगांचे पिंप भरता आले असते...
कमीत कमी अंधारात इंद्रधनुष्य तरी काढता आले असते

किती बरं झालं असतं
किती बरं झालं असतं
पण बरं होत नाही...जर- तर कमीच पडतात...
शहरात रस्ते फोफवतात,
अंधारात घरं फुटतात,
माणसं नाती बदलतात,
असलाच चांगला भाव तर विकून मोकळे होतात,
डोळे रंगांध होतात,
काळ्या कुट्ट अंधारात आरोळ्या मारतात...

किती बरं झालं असतं
जर कविता संपलीच नसती...
कमीत कमी नि:शब्दता मारत बसली नसती
पण बरं होत नाही...जर- तर कमीच पडतात!

-प्रथमेश किशोर पाठक

2 comments: