(आपले आंतरीक पराभव आणि त्या पराभवातून आपण स्व:ताला काहिही आमिषं दाखवून सोडवू बघतो, लांब पळतो... परंतू आपण कितीही खोटी समजूत काढली तरिही वेदना होणारच!)
पराभवाचा काळोख झपाटून टाकतो मन
आणि मग समजुतींचा लगाम सावरू बघतो मनाच्या हिंदकाळलेल्या घोड्याला...
पंखात पूर्ण बळ येण्याआधिच छाटून काढावेत पंख,
तितकच क्रौर्य दडलेलं असतं ह्या खेळात!
आपण अस्ताव्यस्त होवून बघत असतो गुंता, मनातल्या भावनांचा...
कुरतडत नसलो तरी खूपत असते ती जखम...
आपण समजुतींच्या मलमाखाली लपवू बघतो तिचं नागडं अस्तित्व.
काही उसासे, एखाद-दुसरी मिठी आणि सहानुभूतीपर चार शब्द...
असाच प्रवास असतो त्या पराभवांचा क्षणिक दुर जाण्याचा...
याच आभासाच्या दोरांवर झोके बांधून
आपण घेत राहतो हिंदोळे कित्येक दिवस.
मनाचं मरण पुढे ढकलल्याचा आनंद....
पण सरणावरती चंदन ठेऊनही देह जळतोच ना!
-प्रथमऋतू!
No comments:
Post a Comment