Wednesday, July 11, 2012

ओढ पावसाची

(एका लहान मुलाचा पावसाशी संवाद आणि त्याला ’न भिजण्याची’ एक गोंडस धमकी)

चिंब होऊन वाहतो
घाम तनामनातून
तू का कोरडा अजून?
ये  ना झिम्माड धाऊन...

नभ फाटून कोसळ
अस्सा वाऱ्याला घुसळ
माझ्या बालपणावर
जरा मायेने पसर...

धुंद होऊन न्हाऊ रे
गाणी तुझीच गाऊ रे
वीजा, वारा नि धारांचा
खेळ आगळा पाहू रे...

तू असा खळाळत
रानावनातून चल
झाडावेली समवेत
रंग माझाही बदल...

मी साठवतो तुला
मनी गोठवतो तुला
पुन्हा येण्याच्या वचनी
दूर पाठवतो तुला...

तुझ्या येण्याच्या आशेने
मन वितळू लागले
दिवे लागता काजवे
मंद पाजळू लागले...

ओढ माझ्या मनातली
तुला कळत का नाही?
जर येशील उशिरा
बघ बोलणार नाही...

कित्ती केला गडगडाट
अशा वाजवून वीजा
मग बस तू रडत
मी भिजणार नाही...

- अमेय घरत

No comments:

Post a Comment