Wednesday, July 11, 2012

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

(दि.पु.चित्रे यांच्या ह्या कवितेतील पाऊस हा आशिर्वादाचा, कृपेचा पाऊस आहे आणि त्या सदिच्छेसाठी देवाला घातलेलं हे साकडं)

देवा, ह्याही देशात पाऊस पाड
जिथे पाण्याला येतो खुनाचा वास
जिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस अन ताग
देवा, जिथे तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग

देवा, ह्याही देशात पाऊस पाड
जिथे माणसांच खत घालून समाज उगवतात
जिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात
आणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात

देवा, ह्याही देशात पाऊस पाड
जिथे दुष्काळही नशिब फळवून जातात
जिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात
जिथे परोपकाराचा ओव्हरटाईम सदैव चालतो

देवा, ह्याही देशात पाऊस पाड
कारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात
आणि उपाशी मरणारे त्यांना साथ करतात
जिथे दुष्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात
देवा, ह्याही देशात पाऊस पाड

-
दि. पु. चित्रे

1 comment:

  1. देवावर विश्वास ठेवणाऱ्यांनी आहे त्या परिस्थितीत समाधान मानायचे असे आहे त्यामुळे वैताग निषिद्ध.
    व्यक्तिला विधिनिषेधांनी बांधून तिचे वेगळेपण जवळजवळ नष्ट करून एकसंध समाज निर्माण केल्याचे वर्णन ' माणसांचे खत....'असे केले आहे.
    आर्थिक विषमतेची चाड,टोचणी नसल्यानेच उपाशी ' साथ करतात '
    सगळी कविता भारतीय वास्तवाचे भेदक चित्र ण.

    ReplyDelete