Monday, October 1, 2012

पाडगावकरांचा जिप्सी


कसे व्यस्त दिनरात
साच्यामधे बांधलेले
फाटलेल्या भावनांना
नियमांनी सांधलेले

दिनभर ऑफिसात
फाईलींचा हा गराडा
दहा वीस मिनीटात
कविमनाचा चुराडा

तेवढ्यात आला  कोणी
दाराच्या आडून
आजवर होता माझ्या
मनात दडून

खुणावू लागला मज
दूर दूर जाया
क्षितीजाच्या अंगणात
भ्रमण कराया

घरटयात राहूनही
आकाशाची ओढ
मोकळ्या वार्‍याला जशी
स्वैरतेची खोड

विहरत होता
मुक्त सहजपणाने
आपल्या मस्तीत जसा
आपल्या मनाने

पाझरत होता त्याच्या
डॊळ्यात आनंद
भणंग अवस्था तरी
उत्सवात धुंद

चिंता नाही उद्याची
ना दु:ख प्राक्तनाचे
भय नाही पराजय
सुख ना जीताचे

ओळखले त्याला मीही
लगेच दूरून
नेहमीच वाचलेल्या
कविता स्मरून

जुना झाला तरी
आहे आजही तरूण
कविमनातला जिप्सी
खोल मनात दडून


-मयुरी बिरारी- खैरनार
 
 

No comments:

Post a Comment