Monday, June 3, 2013

श्वास...


मृत्यू येइल तेव्हा बघू
आज थोडा जगून घे,
फेकून दे मृत्युचे भय
एकच श्वास उसना दे!

पैसा पैसा करतो काय?
सरणात लाकडाशिवाय काय?
आयुष्य संपत्ती खरी
चार नात्यात उधळून दे!

त्याच शोध घेतो कुठे?
मोक्ष देवळात मिळतो कुठे?
मैत्रीचा तो प्रसाद वाटे
अलिंगनांचे तिर्थ घे!

कविता म्हणे जमत नाही
शब्दात मुळी रसच नाही
मेघ काळा शब्दकोष तो
थेंबात अक्षरे वेचून घे!

कुठेतरी ती दूर असते
आठवण फक्त सोबत असते
संध्याकाळ आठव ती अन
कातरवेळ कुशीत घे!

झेंडू म्हणे सुंदर नसतो
गुलाबातही काटा असतो
उत्सव नसला दारी तरी
मनात तोरण बांधून घे!

-प्रथमेश किशोर पाठक.

2 comments: