Thursday, November 22, 2012

काही चार ओळींच्या कविता - रॉय किणीकर



. हा धनाढ्य पंडित कलावंत हा नेता
   हा मुनि महात्मा कविश्रेष्ठ हा दाता
   मागितले त्यांनी शेवटच्या घटकेला
   पीणार कशाने? फुटका त्यांचा पेला

. ते स्वप्न कालअचे ठेव तिथे पायाशी
   ते स्वप्न उद्याचे ठेव तिथे उशाशी
   हा भरला येथे स्वप्नांचा बाजार
   घे हवे तुला ते, स्वप्न मिळते उधार

. घे शब्दकोश, - ईश्वर शोधुनी काढ
   तो आत्मा दडला कुठल्या शब्दाआड
   अर्थाला असते बंधन का शब्दांचे
   कोसळून पडले इमले अक्षरतेचे

४. सोडूनि वाट, तुडवित जावे काटे
   मोडूनि रांग ती, पडावे बाहेर वाटे।
   जायचे कुठे, जरी ठरले अजूनि नाही
   झोपेन जिथे, उठवणार कोणी नाही


५. गुदमरली काजळकाठावरची धुंदी
  कळवळली हिरवी तळटाचेवरची मेंदी
  पाळणा झुले मांडीवर मिटले ओठ
  पदरातुनी फिरली एक तान्हुली मूठ

६. संपेल कधी ही शोधायाची हाव
  फोडिले दगड दशलक्ष दिसेना देव
  पसरतो शेवटी हात तुझ्या दारात
  अश्रुत भिजावी विझताना ही ज्योत



No comments:

Post a Comment