Thursday, November 22, 2012

रूबाई - किशोर पाठक

रूबाई... रूबाई हा एक काव्यप्रकार आहे आणि त्याचा फारसी भाषेतील अर्थ सुंदर स्त्री असाही होतो.
रूबाई हा काव्यप्रकार अर्थातच मराठी भाषेत ऊर्दू साहित्यातून आलाय. रूबाई म्हणजे ओळींची एक छंदबद्ध कविता. रूबाईतील चारही ओळी एकाच वृत्तात असतात फक्त तिसर्या ओळीत यमक नसते.खाली काही रुबाया (रूबाई चे अनेकवचन) आहेत... मनमुराद आनंद लुटा.



. मी असेन कुणिही माणूस माझे गोत्र
  आयुष्यच हे विस्तीर्ण नदीचे पात्र
  धर्मांनी नहावे स्व्च्छ मनाचे पाणी
  हा थेंब गातसे मानवतेचे स्तोत्र

. त्या झाडाखाली आपण होतो भिजलो
   अन पागोळ्यांच्या पानफुलांनी सजलो
   बघ तिथेच दोघे कुणी अनामिक दिसती
   मी म्हटले नव्हते आपण तेथे रुजलो

. मित्राची पत्नी कधिच सुंदर नसते
   ती दीर- भाऊ च्या मधून चालत असते
   तो चुकतो आणि निघून जातो दूर
   ती कान पकडूनी आई होवून हसते

. ह्या वाटेवरचा तिमीर संपवू थोडा
   बघ उजेड अपुल्या आत आहे केवढा
   चल उगवू आपण विझण्याची का घाई
   ही पणती म्हणते प्रकाशनाती जोडा

. तू म्हटले, आता स्पर्शांचे वय झाले
   मी म्हटले, अजुनि गात्र कसे हे ओले
   एकदाच होतो भिजलो तन्मयवेळी
   त्या थेंबांनी आयुष्य तरूण हे केले

. इतिहास आम्ही सोयीने मढवीत गेलो
   जातींचे कपडे खुशाल चढवीत गेलो
   धर्मस्थळ झाले कारागृह संतांचे
   शिष्यांचे तस्कर आम्ही घडवीत गेलो

No comments:

Post a Comment