Monday, November 11, 2013

क्रेन


खिडकीमधुनी बाहेर बघता
दिसते इमारतीवर क्रेन,
जणु शाईच्या बाटलीपाशी
कुणी खोचला फाऊंटन पेन

उंच उंच त्या इमारतींवर
क्रेनची लागे लांबच रांग,
जणू मल्ल ते उभे आखाडी
म्हणे लोळवू कुणास सांग

क्रेनवरी त्या इमारतीच्या
घिरट्या घालत बसते घार
ग्रासुन जाते आणि म्हणते
इतुका दूर का असे आधार?

इमारतीवर उभी राहूनी
क्रेन घडवीते इमारतीला
बहुव्रिही हा समास आहे
गर्भितार्थ मज आज कळाला

मी ही मग त्या इमारतीच्या
क्रेनपरी रे भक्कम होतो
संपवितो ही कविता आणि
मुंडके कामामधे खुपसतो
-प्रथमेश किशोर पाठक

No comments:

Post a Comment